Shiv Sena Chief Uddhav Thackeray Slams on BJP, Pm Narendra Modi : मंदिर बांधण्यासाठी जी हिंमत लागते ती नसल्याने लोकांनी काँग्रेसला धूळ चारली व हिंमतबाज छप्पन इंचवाल्यांच्या हाती कारभाराच्या किल्ल्या सोपवल्या. तरीही त्यांना जळी, स्थळी, काष्ठी,… काँग्रेस दिसत असेल तर तुमच्या छातीचे मोजमाप जनतेला पुन्हा घ्यावे लागेल. रामाने तुमचे मनोरथ सफल केले. त्या बदल्यात राम अखंड वनवासी राहणार असेल तर राजकीय नौटंकी बंद करा. मोदी यांना मंदिर उभारायचे आहे, पण काँग्रेसचा अडथळा आहे. काँग्रेसचा अडथळा असतानाही नोटाबंदीची बाबरी उभारली. काँग्रेसचा अडथळा असतानाही जम्मू-कश्मीरात मेहबुबा मुफ्तीबरोबर सरकार स्थापन केले होतेच ना? अनेक वेळा काँग्रेसला फोडून व झोपवून अडथळे दूर केले. मग राममंदिराचा अडथळा काय आहे?, असा थेट सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.
अयोध्येत जे येतात त्यांचे मनोरथ पूर्ण होते, असे सांगतात. आम्ही अयोध्येत आलो ते वैयक्तिक आणि राजकीय मनोरथ घेऊन नाही, तर आपल्या अयोध्येतच वनवास भोगणाऱ्या श्रीरामाच्या हक्काच्या मंदिरासाठी. अयोध्यावासीयांनी आमचे प्रेमाने आगत स्वागत केले, ‘झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या, फुले उधळली. त्यामुळे आम्ही आनंदी झालो असलो तरी रामजन्मस्थानी वनवास भोगणाऱ्या रामप्रभूंची व्यथा घेऊन आम्ही महाराष्ट्रात परतलो आहोत. आमच्या अयोध्या दौऱ्याने एक काम मात्र नक्कीच झाले, राममंदिरप्रश्नी जे झोपले होते त्यांनी कूस बदलली नाही, पण डोळे मात्र उघडले आहेत. राममंदिराविषयी जुमलेबाजी आणि थापेबाजी चालणार नाही याची जाणीव सगळ्यांनाच झाली. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनामध्ये 'राम मंदिर आणि अयोध्या दौरा' या विषयावर लिहीलेल्या लेखात आपली मत व्यक्त केली आहे. (हेही वाचा, अखेर राम मंदिर प्रश्नावर नरेंद्र मोदी यांनी मौन सोडले; अयोध्येत राम मंदिर व्हावे अशी काँग्रेसची इच्छा नाही)
मंदिर सरकारनेच बांधायचे आहे व कायद्याच्या चौकटीत राहून बांधायचे असे भाजपने त्यांच्या अजेंड्यात म्हणजे जाहीरनाम्यात सांगितले आहे. त्या चौकटीत राममंदिर कधी बसवणार? तिहेरी तलाकसारखे विषय त्या चौकटीतून बाहेर पडले. मग मंदिर का अडकले? एक कायदाच राममंदिरासाठी बनवायचा आहे. चौकटीचे काय घेऊन बसलात. तुम्ही सर्व काही करता, पण राममंदिराचा विषय काढला की विंचू चावल्याचा झटका बसल्यासारखे कळवळता, पळून जाता. राममंदिराची निर्मिती ही तुम्हाला कडू जहाल विषासारखी वाटत असेल, पण हे हलाहल पचवावेच लागेल. राममंदिरप्रश्नी काँग्रेस अडथळे आणत असेल तर एक सर्वपक्षीय बैठक आधी बोलवा व राममंदिरप्रश्नी सरकार अध्यादेश काढून काम सुरू करीत असल्याची ‘work order’ काढून टाका, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.