राजकारण हा नेहमीच आकड्यांचा खेळ असतो. ज्याच्याकडे संख्याबळाचे आकडे अधिक त्याची सत्ता. बहुमतासाठी जेव्हा आकडे पुरेसे नसतात त्यावेळी मग इतरांची मदत घेऊन सत्तेचा मार्ग धरावा लागतो. कधी कधी थेट विरोधातही बसावे लागते. महाराष्ट्रात आज शिवसेना (,Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस असे तीन पक्ष महाविकासआघडीच्या रुपात सत्तेत आहेत. महाविकासआघाडीत शिवसेना हा क्रमांक एकचा पक्ष आहे. असे असले तरी या पक्ष स्वबळावर सत्तेत नाही. राजकारणाच्या भूतकाळात रमणाऱ्या अनेकांना असे वाटते की, शिवसेना सोडून गेलेले चार प्रमुख नेते जे आज वेगवेगळ्या पक्षात महत्त्वाच्या पदावर आहेत. ते नेते जर आज शिवसेनेत असते तर शिवसेना स्वबळावर सत्तेत असती काय? हे चार नेते म्हणजे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), नारायण राणे (Narayan Rane), राज ठाकरे (Raj Thackeray) आणि गणेश नाईक (Ganesh Naik). आजच्या राजकारणाच्य कसोटीवर पडताळून पाहायचे तर खरोखरच शिवसेना सत्तेत (स्वबळावर) असती काय?
छगन भुजबळ
छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली आणि त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्या वेळी शरद पवार काँग्रेसमध्ये होते आणि काँग्रेस सत्तेत होती. शिवसेनेतील काही आमदार सोबत घेऊन त्यांनी काँग्रेसमध्ये डेरा टाकला. शिवसेनेला मिळालेला हा पहिला हादरा होता. शिवसेना तेव्हा सत्तेत नव्हती पण आक्रमक होती. ओबिसीच्या मुद्द्यावर शिवसेना नेतृत्वाशी मतभेद झाल्याने त्यांनी शिवसेना सोडली. तोपर्यंत छगन भुजबळ हे मुंबईपूरते मर्यादित नेते होते. परंतू, पुढे ओबिसी मुद्द्यावर आपला जनाधार व्यापक होऊ शकतो हे ध्यानात आल्यानंतर (आणि शिवसेनेसमोर आपला टीकाव लागणार नाही हे लक्षात आल्यानेही) त्यांनी नाशिक येथे आपले राजकीय बस्तान बसवले. पुढे शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. या काळात छगन भुजबळ यांनी अनेक महत्त्वाची पदे मिळवली. त्याचा फायदा राष्ट्रावादीलाही झाला. परंतू, यात महत्त्वाचे म्हणजे भुजबळ यांचे नेतृत्वही तसे बदलत गेले. शिसेनेत असलेल्या भुजबळांचे नेतृत्व अशा पद्धतीने बदललेच असते का? याबाबत मोठी शंका निर्माण होते. त्यामुळे शिवसेना स्वबळावर सत्तेत येण्यासाठी त्याचा कितपत फायदा झाला असता याबाबतही तिच शंका निर्माण होते. (हेही वाचा, Election of President of India: भारताचे राष्ट्रपती कसे निवडले जातात? जाणून घ्या निवडणूक प्रक्रिया, मतदान पद्धती आणि निवड)
राज ठाकरे
Raj Thackeray | (Photo Credits: Facebook) Raj Thackeray | (Photo Credits: Facebook)ठाकरे आडनावाचे वलय. दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे लकब आणि वृक्तृत्वशैली सोबत तड की फड स्वभावही. याची उपजतच देणगी मिळालेले राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. खरे म्हणजे हे कधी ना कधी होणारच होते. नेमके कधी इतकाच प्रश्न होता. कारण जेव्हा उद्धव ठाकेर शिवसेना कार्याध्यक्ष झाले तेव्हाच किंवा त्याच्याही आगोदरपासून याची बिजे रोवली गेली होती. त्यामुळे राज ठाकरे कधी ना कधी शिवसेनेतून बाहेर पडणार हे नक्कीच होते. परंतू, आज जर ते शिवसेनेत असते तर त्याचा शिवसेनेला नेमका किती फायदा झाला असता. या प्रश्नाचे उत्तर टक्केवारी, अथवा आकडेवारीत देता येत नाही. मुंबई हा शिवसेनेचा प्राण आणि बालेकिल्लाही आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या जाण्याने सहाजिकच मराठी मतदार आणि शिवसेना समर्थकांमध्ये मोठी दुभागणी झाली. असे असले तरी सुरुवातीचा बहराचा काळ वगळता राज ठाकरे यांना म्हणावे तिथके यश आल्याचे मनसेच्या रुपात दिसत नाही. परंतू, आजच्या मनसेची ताकद जर शिवसेनेत असती तर शिवसेनेची ताकद वाढण्यास मात्र नक्कीच मोठी मदत झाली असती हे नकक्की.
नारायण राणे
नारायण राणे हे प्रचंड आक्रमक स्वरुपाचे व्यक्तीमत्व. नारायण राणे आज ज्या ठिकाणी पोहोचले आहेत त्यात त्यांचे कष्ट हा फॅक्टर जरुर आहे. पण त्याहूनही शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवलेला विश्वास आणि संधी हा फॅक्टर अधिक मोठा आहे. शिवसेना आणि राणे या दोन्ही गोष्टी एकमेकांना परस्परपुरक होत्या. मात्र, थेट शिवसेना नेतृत्वाशीस त्यांचे बिनसले. त्यातून त्यांनी शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री पद ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती. ते काँग्रेसमध्ये गेले पण त्यांना मुख्यमंत्री काही होता आले नाही. पुढे त्यांचे नेतृत्व केवळ कोकणपुरते मर्यादीत झाले. नंतर तर शिवसेना उमेदवाराने त्यांचा दोन वेळा पराभव केला. त्यामुळे राणे आज शिवसेनेत असते तर शिवसेनेला किती फायदा झाला असता? असा सवालच मुदलात चुकीचा आहे. कारण
राजकारणात स्थिरावल्यानंतर राणे यांचा स्वभाव पाहता इतक्या प्रदीर्घ काळापर्यंत राणे शिवसेनेत टीकले असते का? टीकले असतेच तर त्यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी जमले असते का? असे अनेक सवाल निर्माण होतात.
गणेश नाईक
नवी मुंबईचे राजकारण म्हणजे गणेश नाईक आणि गणेश नाईक म्हणजे नवी मुंबईचे राजकारण, असे एक समिकरण गेली अनेक वर्षे पाहायला मिळत होते. काही प्रमाणात आजही दिसते. यासोबतच गणेश नाईक म्हणजे नवी मुंबईतील शिवसेना आणि नवी मुंबईतील शिवसेना म्हणजे गणेश नाईक असेही समीकरण होते. दरम्यानच्या काळात त्यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदीर्घ काळ ते शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू म्हणूनही वावरले. पण, असे असले तरी पुढे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गणेश नाईक यांच्या नेतृत्वाचा प्रभाव पाहता तो प्रामुख्याने नवी मुंबई, ठाणे जिल्ह्याचा काही भाग आणि रायगड जिल्ह्यातील काही भाग असा पाहायला मिळतो. गणेश नाईक यांचे नवी मुंबईच्या राजकारणात मोठे स्थान असले तरी त्यांना त्यापलीकडे फार मजल मारता आली नाही. कारण त्यांच्या प्रभावक्षेत्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष आजही ताकदवान असल्याचे दिसते.
दरम्यान, शेवटी राजकारणात जर-तरला शून्य किंमत असते. जर तरवर राजकारण चालत नाही. त्यामुळे भुतकाळातील नोंदींनी भविष्यातील रणनिती जरुर आखता येते. परंतू, भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी घडून गेल्या नसत्या तर आज काय घडले असते असा प्रश्न केवळ निरर्थक ठरतो. त्यामुळे छगन भुजबळ, राज ठाकरे, नारायण राणे आणि गणेश नाईक हे नेते आज शिवसेनेत असते तर शिववसेना कोणत्या स्वरुपात असती किंवा सत्तेत असती का या प्रश्नाचे उत्तर शोधत वेळ न घालवलेलाच बरा.