Interesting facts about Shiv Sena's founder Bal Thackeray | (Photo courtesy: archived, edited, representative image)

Bal Thackeray Birth Anniversary: व्यंगचित्र, भाषण, संघटन, नेतृत्व, निर्णय आणि दिलदारपणा यांसह अनेक स्वभाववैशिष्ट्य तुम्हास एकत्र पहायची असतील तर अपसूकच एक नाव ओठावर येते ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray). महाराष्ट्राच्या राजकीय, सांस्कृतीक आणि ऐतिहासिक इतिहासाची नोंद घ्यायची तर, या व्यक्तिमत्वाला टाळून ती घेणे शक्यच नाही. मतभेदांना मनभेदांच्या पातळीवर न येऊ देणारे हे व्यक्तिमत्व केवळ स्वकीयांनाच नव्हे तर त्यांच्या विरोधकांनाही भलतेच प्रिय होते. हे विरोधक मग राजकारणातले असो की समाजकारणातले. याचे एक उत्तर उदाहरण म्हणजे बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे कम्युनिस्टांशी (Communist) कधीच पटले नाही. खरे तर कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईतून डावी चळवळ (Left movement) संपवण्यात शिवसेनेचाच मोठा वाटा आहे. त्यासाठी सत्ताधारी आणि इतर कोणकोणत्या पक्षांनी त्यांना सहकार्य केले हा वेगळा अभ्यासाचा विषय. पण, असे असले तरी बाळासाहेबांचा कम्युनिस्ट विचारांना विरोध होता. कम्युनिझम (Communism) मानणाऱ्या व्यक्तिला नव्हे. कदाचित म्हणूनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या एका प्रमुख मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे (Shripad Amrit Dange) यांना निमंत्रण दिले होते. यांसारखी एकच काय अनेक उदाहणे देता येतील. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन होऊन आज सहा वर्षे होत आली. पण, या व्यक्तिमत्वाचे गारुड आजही कायम आहे. 23 जानेवारीला त्यांची जयंती शिवसैनिक (Shiv Sainik) जल्लोशात साजरी करतील. त्यांच्या जयंतीनिमत्त बाळासाहेबांचे काही खास किस्से आणि आठवणी लेटेस्टली मराठीच्या खास वाचकांसाठी.

'संज्या, फिकर मत कर'

Balasaheb Thackeray and Sanjay Dutt | (Photo courtesy: archived, edited, representative image)

एखाद्या व्यक्तिसोबत मैत्री झाली की बाळासाहेब त्या व्यक्तिला त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारत. त्याचे कुटुंबीय आपल्या कुटुंबीयांप्रमाणेच मानत. कदाचित म्हणूनच देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झालन्यानंतरसुद्धा ठाकरे यांचे दत्त कुटुंबीयांशी सौहादपूर्ण संबंध राहिले. सुनिल दत्त आणि बाळासाहेब ठाकरे यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे त्यांनी सुनिल दत्त (Sunil Dutt) यांचा मुलगा संजय दत्त (Sanjay Dutt) यालाही कधी अव्हेरले नाही. त्याला टाडाखाली अटक झाल्यावर अर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले. तरीसुद्धा बाळासाहेब त्याला तू काळजी करु नकोस. तू लवकरच बाहेर येशील असे सांगत. एका कार्यक्रमात स्वत: संजय दत्तनेही सांगितले की, बाळासाहेब मला संज्या म्हाणायचे. मी अर्थर रोड तुरुंगात अताना त्यांचा मला रोज मेसेज यायचा 'संज्या, फिकर मत कर'. तुरुंगातून बाहेर आल्यावर संजय दत्त याने पहिल्यांदा मुंबई सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर तो थेट बाळासाहेबांना भेटायला 'मातोश्री'वर गेला. (हेही वाचा, महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात चर्चित आणि प्रभावी महिला)

'कमळीची चिंता करु नका'

Bal Thackeray , Sharad Pawar, Supriya Sule | (Photo courtesy: archived, edited, representative image)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कन्या राज्यसभा सदस्याच्या रुपात संसदीय पातळीवर राष्ट्रीय राजकारणात उतरणार होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसने सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा अर्ज भरण्यापूर्वी आवश्यक तितक्या मतांची जुळवाजुळवही केली होती. तशा बातम्या प्रसारमाध्यमांतून आल्या. बाळासाहेबांनाही ही माहिती समजली. त्यानी थेट शरद पवार यांना फोन केला. फोनवर बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचा संवाद झाला तो काहीसा असा होता..

बाळासाहेब ठाकरे: सुप्रिया सुळे राज्यसभेसाठी अर्ज भरतायत खरं काय?

शरद पवार: हो खरंय! युतीचा उमेदवार कोण?

बाळासाहेब: काय बोलता शरदबाबू (बाळासाहेब शरद पवार यांना शरदबाबू म्हणायचे) माझ्या मित्राची मुलगी पहिल्यांदा राज्यसभेवर निघाली आहे आणि मी उमेदवार देऊ? ते शक्य नाही. सुप्रिया राज्यसभेवर बिनविरोध जाईन. शिवसेना उमेदवार देणार नाही'.

शरद पवार: तुमच्या मित्रपक्षाचे (भाजप) काय?

बाळासाहेब: शिवसेना उमेदवार देणार नाही. आणि कमीळीची (भाजप) चिंता तुम्ही सोडा. ते मी बघीन.

हा संवाद प्रत्यक्षात उतरला सुप्रिया सुळे राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेल्या.

(हेही वाचा, Bal Thackeray Birth Anniversary: मराठी माणसाचा कणा- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे)

सुशीलकुमार शिंदे: 'माणूस चांगला पण, काँग्रेसमध्ये नासलाय'

Sushilkumar Shinde and Balasaheb Thackeray | (Photo courtesy: archived, edited, representative image)

बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि काँग्रेस नेतृत्वावर नेहमीच टीका करत. पण, असे असले तरी काँग्रेसच्या अनेक नेत्यांसोबत त्यांचे व्यक्तगत पातळीवरचे संबंध सौहार्दाचे आणि कौटुंबिक पातळीवरचेही होते. माजी केंद्रीय गृहमंत्री आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबतही त्यांचे असेच संबंध होते. ते त्यांनी कधी लपवूनही ठेवले नाही. सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर व्यासपीठावरुन बोलताना बाळासाहेब एकदा म्हणाले होते. सुशीलकुमार माणूस चांगला आहे. पण, काँग्रेसमध्ये नासला आहे.  (हेही वाचा, बाळासाहेब ठाकरेंना या 3 नेत्यानी दिली सर्वात जास्त यातना)

'बारामतीचा म्हमद्या', 'मैद्याचं पोतं'

Sharad Pawar and Bal Thackeray | (Photo courtesy: archived, edited, representative image)

बाळासाहेब ठाकरे हे आपल्या भाषणांतून विरोधकांवर अत्यंत तीव्र शब्दांत टीका करत असत. त्यातूनच त्यांची भाषणाची ठाकरी शैली उदयास आली. त्या काळचे काँग्रेस नेते आणि आताचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही ठाकरे यांनी जोरदार प्रहार केले आहेत. शरद पवार यांच्याबाबत ठाकरे यांना नितांत आदर होता. तसेच, त्यांचे व्यक्तिगत पातळीवरचे संबंधही अत्यंत सौहार्दपूर्ण होते. असे असले तरी, जाहीर भाषणांतून मात्र ते त्यांच्यावर अत्यंत शेलक्या भाषेत टीका करत. बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवार यांचा 'बारामतीचा म्हमद्या', 'मैद्याचं पोतं' असा जाहीर भाषणांतून अनेकदा उल्लेख केला आहे. इतकी जहाल टीका करुनही त्यांच्यातील मित्रप्रेमात मात्र कधीच अंतर आले नाही.