हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (फोटो सौजन्य- फेसबुक)

Bal Thackeray Jayanti 2019:  साम दंड भेदाच्या मार्गाने जाऊनी जिंकली लोकांची मने, बनूनी लोकनेता जनतेच्या मनी दिले हिंदूत्वरक्षकाचे धडे. असे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना 23 जानेवारी, 2019 रोजी येणाऱ्या जयंती निमित्त त्रिवार वंदन! कट्टर शिवसैनिक, मराठी अस्मितेची शान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे कणखरपणे नेतृत्व म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.

बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी अथांग मेहनत, परिश्रम आणि जिद्द दाखवत संपूर्ण महाराष्ट्रात मराठी माणसाला मानसन्मान मिळवून दिला आहे. तसेच जेव्हा बाळासाहेबांचे पाऊल प्रत्येक जाहीर सभेच्या मंचावर पडायचे तेव्हा 'कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला' ही एकच गर्जना आसमंतात दुमदुमायची. शिवसैनिकांची मने जिंकत आजवर वाघाची गर्जना संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्याला ऐकायला येते. तर तुम्हाला माहिती आहेत का बाळासाहेबांची ही भाषणे.

वडिलांच्या अमूल्य वचनाचा ठेवा

2000 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी एकदा मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यावेळी शिवसेनेचे पदाधिकार आणि तमाम शिवसैनिक मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित होते. बाळासाहेब येतात आणि... तितक्यात जमलेल्या तमाम शिवसैनिकांकडून जोरदार टाळ्यांचा कडकडाटात बाळेसाहेबांचे स्वागत होते. त्यानंतर बाळासाहेब भाषणासाठी उभे राहताच पहिला शब्द 'जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनिंनो' म्हणत त्यांच्या भाषणाला सुरुवात होते. सर्वांचे आभार मानत पुढे भाषणाला सुरुवात करतात आणि वडिलांचे अमूल्य वचन आठवत बाळासाहेब म्हणतात, मला माझ्या वडिलांनी सांगितले होते भाषण करु नको, तर लोकांशी बोल. (Gossip with people) तसेच माझ्या वागण्याबोलण्याचे भरभरुन कौतूकही केले. मात्र पैसा हे सर्वस्व नसते म्हणजेच एक नक्की की हा मंत्री कधीच होणार नाही असे ही बाळासाहेबांना त्यांच्या वडिलांनी म्हटले होते. त्याचप्रमाणे अजून अमूल्य वचन म्हणजे प्रबोधनकर ठाकरे यांनी त्यांना असे सांगितले होते की, आयुष्यात हात नेहमीच स्वच्छ ठेव बाळ. म्हणजेच काय हात स्वच्छ राहतील तर उभ्या आयुष्यात ब्रम्हदेव जरी खाली उतरले तरीही कोणालाही भिण्याचे कारण नाही. अशा या तडफदार अमूल्य वचानांचा ठेवा बाळासाहेबांनी नेहमीच आपल्या सोबत ठेवत जनतेच्या हक्कांसाठी सदैव लढत राहीले.

मराठी माणसाचा कणा म्हणजे 'साहेब'

बाळासाहेबांनी मराठी माणसाचा कणा बनून त्यांच्या हक्कांसाठी झटत राहिले. मराठी भाषेचा गर्व आणि भगवा सर्वत्र फडकावा यासाठी अथांग मेहनत केली. विरोधकांना न जुमानता आपल्या जनतेला न्याय मिळवून देणे हे एकच लक्ष बाळासाहेबांनी बाळगले होते. मराठी माणसाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर बाळासाहेबांनी एकदा सभेत हॉटेल्सची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे असे म्हटले. तोच मराठी माणसामधील एकाचे तरीही पंचतारांकीत हॉटेल आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. शेवटी उत्तर एकाचे ही आले नाही. त्यावेळी राव बहादुर यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांची जगाच्या पाठीवर जवळजवळ 37-38 हॉटेल असल्याचे म्हटले. मात्र महाराष्ट्रात एक हॉटेल काढायचे म्हणजे हॉटेल बंद झाल्यानंतर हॉटेलमधील किती काटे चमचे आहेत याची मोजणी सुरु होण्यापासूनचे प्रश्न एकापुढे एक येऊन थांबतात असे म्हटले. त्यातल्या त्यात चोरणारे तर खुपच आहेत असे हास्यास्पद वक्तव्य बाळासाहेबांनी केले. परंतु कामासाठी कधीच कमीपणा न बाळता आपल्या समोरील काम जिद्दीने करणे यातच मोठा थोरपणा माना. तर नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देण्याची महत्वाकांक्षा प्रत्येक मराठी माणसाने आपल्या उरी बाळगली पाहिजे असा मोलाचा संदेश बाळासाहेबांनी शिवसैनिकांना नेहमीच दिला.

'ठाणे' म्हणजे आवडते शहर- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

बऱ्याच वर्षांनी बाळासाहेबांनी ठाण्यात आपले पुन्हा पाऊल ठेवले होते. त्यावेळी आयोजित केलेल्या जाहीर सभेवेळी नेहमीप्रमाणे सर्व शिवसैनिकांचे स्वागत करत भाषणाला सुरुवात केली. वय वाढतेय, थकवा वाढतेय त्यामुळे पूर्वीसारखा शिवसेनाप्रमुख दिसणार नाही असे हृदयाला स्पर्श करणारे शब्द उच्चारले. जणू जमलेल्या शिवसैनिकांच्या डोळ्यात चटकन पाणी उभे रहावे असे त्यांचे शब्द लक्षात ठेवण्यासारखे होते. पुढे बोलताना बाळासाहेबांनी, पूर्वीचे दिवस आठवले तर पूर्वी गावदेवी मैदान आणि आता मुंबई सेंन्ट्रल मैदान सध्या गाजत असल्याचे म्हटले. त्यामुळे मैदानासाठी कधीच मी कोर्टाची पायरी चढली नाही. अशा तऱ्हेने जे विचार मनात आले ते नेहमी अंमलात आणून त्यानुसार कार्य केले आहे. मात्र ठाणा हे माझे आवडते शहर असल्याचा उल्लेख बाळासाहेबांनी त्यांच्या भाषणातून केला होता. या ठाण्याने शिवसेनेचा पहिला झेंडा फडकविला, तर पहिला नगराध्यक्ष ही ठाण्यातून निवडणून आल्याचा अभिमान बाळासाहेबांनी त्यावेळी व्यक्त केला होता.त्यामुळे कोणतीही सभा घेण्यापूर्वी मी ठाण्यात येऊन नंतरच शिवतीर्थीवर जातो असे छातीठोकपणे जमलेल्या तमाम शिवसैनिकांना संबोधून सांगितले.

बाळासाहेबांसारखे थोर विचारवंत नेते होणे कठीणच. त्यामुळे बाळासाहेबांच्या जयंती निमित्त त्यांना मानवंदना देऊन एकच म्हणावेसे वाटते:

वारकरी, धारकरी, शेतकरी, कष्टकरी,

श्रमिक कामगारांचा दाता,

अखंड हिंदूत्वाचा कैवारी,

मराठी माणूस, मराठी भाषा,

अन् अनाथांचा नाथा,

कार्य तुझे अवतारी