Cyber Attack Representational Image | (Photo Credits: PTI)

उच्च पगाराच्या सॉफ्टवेअर व्यावसायिकांसह सुमारे 15,000 भारतीयांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली आहे. हे नागरिक चिनी ऑपरेटर्सनी केलेल्या 700 कोटी रुपयांच्या क्रिप्टोवॉलेट गुंतवणूक फसवणुकीला बळी पडले आहेत. हैदराबादचे पोलीस आयुक्त सीव्ही आनंद यांनी सोमवारी ही माहिती दिली. अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, पीडितांना यूट्यूब व्हिडिओ (YouTube Video) लाईक करणे, तसेच गुगल रिव्ह्यू लिहिणे यांसारखी साधी कामे सोपवण्यात आली होती आणि ती पूर्ण झाल्यावर त्यांना पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र हे पैसे त्यांना देण्यात आले नाहीत.

हैदराबाद पोलिसांनी शनिवारी चिनी ऑपरेटर्सच्या 712 कोटी रुपयांच्या क्रिप्टोवॉलेट गुंतवणूक फसवणुकीचा पर्दाफाश केल्याची घोषणा केली. याप्रकरणी देशभरातून नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, फसवणुकीत गुंतलेले काही क्रिप्टोकरन्सी व्यवहार हेजबुल्ला वॉलेटशी निगडीत होते, जे लेबनीज दहशतवादी फंडिंग मॉड्यूलशी संबंधित असल्याचे मानले जाते.

राज्य पोलीस या घटनेबाबत केंद्रीय यंत्रणांना माहिती देत ​​आहेत आणि सर्व संबंधित तपशील केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सायबर क्राईम युनिटला देण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे उच्च पगार असलेल्या सॉफ्टवेअर व्यावसायिकांचेही 82 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ज्या लोकांना सरासरी 5 ते 6 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे त्यांच्याशी टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅपवर संपर्क साधण्यात आला होता.  अशा लोकांनी 5,000 पर्यंत किरकोळ रक्कम गुंतवली होती. ज्याच्या बदल्यात त्याला खूप चांगला परतावा मिळणार होता. मात्र सर्व कामे पूर्ण होईपर्यंत किंवा झाल्यानंतर त्यांना पैसे काढता आले नाहीत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर क्राईम पोलिसांनी हैदराबाद येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. तक्रारकर्त्याने म्हटले आहे की, त्याला मेसेजिंग अॅपद्वारे 'रेटिंग आणि रिव्ह्यू’साठी अर्धवेळ नोकरीची ऑफर देण्यात आली होती. हा जॉब खरा असल्याचा विश्वास ठेवून त्याने वेबसाइटवर नोंदणी केली आणि गुंवणूक करू लागला. मात्र काही काळानंतर तो फसवणुकीचा बळी ठरल्याचे त्याच्या लक्षात आले.

एनडीटीव्हीच्या अहवालानुसार, प्रकरणाची चौकशी केल्यानंतर, अधिकाऱ्यांना सुरुवातीला फसवणुकीत गुंतलेल्या शेल कंपन्यांशी संबंधित 48 बँक खाती आढळून आली. त्यावेळी या घोटाळ्याची अंदाजे किंमत 584 कोटी रुपये मानली जात होती. मात्र, तपासात प्रगती होत असताना, घोटाळेबाजांनी अतिरिक्त 128 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आणि एकूण 113 भारतीय बँक खाती या फसवणुकीमध्ये वापरली गेल्याचे दिसून आले. (हेही वाचा: EPF Scheme for 2023-24 Interest: ईपीएफ वर मिळणार 8.15% व्याज; सरकारची माहिती)

अनेक खात्यांद्वारे पैसे हस्तांतरित केले गेले आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित केले गेले. त्यानंतर ते दुबईमार्गे चीनला पाठवण्यात आले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘भारतीय सिमकार्ड वापरून भारतात उघडलेली खाती नंतर दुबईत दूरस्थपणे चालवली गेली. फसवणूक करणारे चिनी ऑपरेटर्सच्या संपर्कात होते, जे या घोटाळ्याचे सूत्रधार आहेत.’