अमेरिकेच्या पेंटागॉनला (Pentagon) मागे टाकून भारताकडे आता जगातील सर्वात मोठी कार्यालयीन इमारत (World's Largest Office) असेल. ही इमारत गुजरातच्या सुरतमध्ये (Surat) उभी राहिली आहे. सुरतच्या या इमारतीमध्ये डायमंड ट्रेडिंग सेंटर असेल. जगातील जवळपास 90 टक्के हिऱ्यांवर सुरतमध्ये प्रक्रिया केली जाते, पण असे असूनही मुंबई हे त्यांच्या व्यापाराचे केंद्र राहिले आहे. आता सुरतची ही समस्या दूर होणार आहे, कारण येथे 'सूरत डायमंड मार्केट' (SDB) ची इमारत बनून तयार आहे. तब्बल 15 मजल्यांची 9 टॉवर असलेली ही प्रशस्त इमारत आहे.
नव्याने बांधलेले सूरत डायमंड मार्केट हे कटर, पॉलिशर्स आणि व्यापाऱ्यांसह 65,000 हून अधिक हिरे व्यावसायिकांसाठी ‘वन-स्टॉप डेस्टिनेशन’ असेल. या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीपूर्वी करू शकतात. आतापर्यंत जगातील सर्वात मोठी कार्यालयीन इमारत पेंटागॉन होती. तब्बल 80 वर्षांपासून हे पद पेंटागॉन कार्यालयाकडे होते, मात्र आता ते सुरतच्या नावावर असेल.
World's largest office building is now Surat Diamond Bourse, Gujarat overtaking Pentagon. (CNN) pic.twitter.com/3VVZ4y4omc
— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) July 18, 2023
सुरतचा हा ‘हिरा बाजार’ सुमारे 3200 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आला आहे. जगभरातील सुमारे 350 डायमंड कंपन्यांच्या कार्यालयांव्यतिरिक्त, या इमारतीच्या 9 टॉवर्समध्ये डायमंड चाचणी प्रयोगशाळा, ग्रेडिंग आणि प्रमाणपत्र, बँका, सुरक्षा व्हॉल्ट, कस्टम झोन आणि रेस्टॉरंट्स देखील असतील. दिवाळीपूर्वी या इमारतीतून हिऱ्यांचा व्यापार सुरू होणे अपेक्षित आहे. हे जगातील सर्वात मोठे हिरे बाजार असेल, त्यामुळे सुरत विमानतळावरही अनेक नव्या सुविधा जोडल्या जात आहेत.
(हेही वाचा: NitiAayog Report:भारतातील सुमारे 135 दशलक्ष नागरिकांची विविध प्रकारच्या दारिद्र्यातून सुटका)
अमेरिकन संरक्षण मंत्रालयाचे कार्यालय असलेल्या पेंटागॉनचे बिल्ट-अप क्षेत्र 66,73,624 चौरस फूट आहे. तर सुरत डायमंड मार्केटचे बिल्ट-अप एरिया 67,28,604 स्क्वेअर फूट आहे. अशाप्रकारे हे जगातील सर्वात मोठे ऑफिस स्पेस असेल. दुसरीकडे, मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मध्ये बांधलेल्या भारत डायमंड बझारमध्ये सुमारे 2500 कार्यालये आहेत, हे सध्या जगातील सर्वात मोठे हिरे व्यापार केंद्र आहे. मात्र आता सुरत हिरा बाजार येथे सुमारे 4500 कार्यालये असतील. सूरत डायमंड मार्केटचा मुख्य उद्देश सुरतमध्ये उपस्थित असलेल्या सुमारे 10,000 हिरे व्यापाऱ्यांना एकाच ठिकाणी आणणे आहे.