World Food India 2023: उद्या पीएम नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार 'वर्ल्ड फूड इंडिया 2023' चे उद्घाटन; 80 हून अधिक देश सहभागी होण्याची शक्यता, जाणून घ्या सविस्तर
PM Narendra Modi (photo Credit - Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे मेगा फूड इव्हेंट ‘वर्ल्ड फूड इंडिया 2023’ (World Food India 2023) च्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन होणार आहे. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडून या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट भारताच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीची जगाला ओळख करून देणे, भारताला ‘जगातील अन्नाची बास्केट’ म्हणून दाखवणे आणि 2023 हे मिलेट्सचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे करणे हा आहे.

वर्ल्ड फूड इंडिया 2023 चा भाग म्हणून पंतप्रधान फूड स्ट्रीटचे उद्घाटन देखील करतील. यामध्ये प्रादेशिक पाककृती आणि शाही पाककृती सादर केल्या जातील. यामध्ये 200 हून अधिक शेफ सहभागी होतील आणि पारंपारिक भारतीय पाककृती सादर करतील. वर्ल्ड फूड इंडिया इव्हेंटमध्ये आयुष आहारासह आयुष स्टार्टअप्सची नाविन्यपूर्ण उत्पादने प्रदर्शित केली जातील.

यावेळी बचत गटांना बळकटी देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान बचत गटांच्या एक लाखाहून अधिक सदस्यांसाठी बीज भांडवल सहाय्य वितरित करतील. या मदतीमुळे बचत गटांना सुधारित पॅकेजिंग आणि दर्जेदार उत्पादनाद्वारे बाजारपेठेत चांगली किंमत मिळवण्यात मदत होईल. हा कार्यक्रम सरकारी संस्था, उद्योग व्यावसायिक, शेतकरी, उद्योजक आणि इतर भागधारकांना चर्चेत सहभागी होण्यासाठी, भागीदारी प्रस्थापित करण्यासाठी आणि कृषी-अन्न क्षेत्रात गुंतवणूकीच्या संधी शोधण्यासाठी नेटवर्किंग आणि व्यवसाय मंच प्रदान करेल. (हेही वाचा: 8th Pay Commission: जुनी पेन्शन योजना, 18 टक्के DA आणि 8 व्या वेतन आयोगाची स्थापना आदी मागण्यासाठी कर्मचारी रामलीला मैदानावर तिसरी रॅली काढणार)

या ठिकाणी भारतीय अन्न प्रक्रिया उद्योगातील नावीन्य आणि सामर्थ्य दर्शविण्यासाठी विविध मंडप उभारले जातील. या कार्यक्रमात अन्न प्रक्रिया उद्योगाच्या विविध पैलूंवर लक्ष केंद्रित करणारी 48 सत्रे आयोजित करेल, ज्यामध्ये आर्थिक सक्षमीकरण, गुणवत्ता हमी आणि यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानातील नवकल्पनांवर भर दिला जाईल. हा कार्यक्रमात प्रमुख अन्न प्रक्रिया कंपन्यांच्या सीईओंसह 80 हून अधिक देशांतील लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. नेदरलँड्स भागीदार देश म्हणून काम करेल, तर जपान हा कार्यक्रमाचा फोकस देश असेल.