Rishabh Pant (Photo Credit- X)

India National Cricket Team vs England Cricket Team: इंग्लंडमध्ये दाखल झाल्यापासून भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने 3 कसोटी सामन्यांतील 5 डावांमध्ये तब्बल 83.20 च्या अविश्वसनीय सरासरीने 416 धावा केल्या आहेत. प्रत्येक डावासोबत पंत नवनवीन विक्रम रचत आहे. लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावातही त्याने शानदार फलंदाजी करत 74 धावांची दमदार खेळी केली. जर पंतचा फॉर्म दुसऱ्या डावातही असाच कायम राहिला, तर तो रोहित शर्माचा एक मोठा विक्रम मोडून नवा इतिहास रचेल. (हे देखील वाचा: IND vs ENG 2nd Test 2025: भारत-इंग्लंड तिसरा कसोटी सामना; कधी, कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या लॉर्ड्स कसोटीची A टू Z माहिती!)

रोहित शर्माचा विक्रम मोडण्याच्या जवळ

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सध्या रोहित शर्माच्या नावावर आहे. 'हिटमॅन'ने 69 डावांमध्ये 2716 धावा केल्या आहेत. या यादीत ऋषभ पंत दुसऱ्या स्थानावर आहे. पंतने 65 डावांमध्ये 2668 धावा जमा केल्या आहेत. आता लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात जर पंतने आणखी 49 धावा केल्या, तर तो रोहित शर्माचा हा विक्रम मोडून WTC मध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात पंतने 112 चेंडूंमध्ये 74 धावांची अप्रतिम खेळी केली. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 2 षटकार मारले. मात्र, तो दुर्दैवाने धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.

इंग्लिश भूमी पंतला चांगलीच मानवते!

इंग्लंडविरुद्धच्या सुरू असलेल्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऋषभ पंतचा फॉर्म चांगलाच बहरला आहे. आतापर्यंतच्या 3 कसोटी सामन्यांतील 5 डावांमध्ये त्याने 416धावा फटकावल्या आहेत. हेडिंग्ले येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये पंतने शतके झळकावली होती. तर, एजबेस्टन कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने केवळ 58 चेंडूंमध्ये 65 धावांची आक्रमक खेळी केली होती. विशेष म्हणजे, इंग्लंडच्या भूमीवर खेळलेल्या मागील 8 डावांमध्ये पंतने 669 धावा केल्या आहेत, ज्यात 3 शतके आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. पंत आपल्या दमदार खेळीने भारतासाठी विजयात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे आणि त्याच्या या फॉर्ममुळे भारतीय संघाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात तो रोहितचा विक्रम मोडतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल!