Rahul Gandhi | (Photo Cedit - X)

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi News) यांनी शुक्रवारी निवडणूक आयोगावर (ECI) गंभीर आरोप करताना, तो 'भाजपाची शाखा' बनल्याचा आणि बिहारमध्ये निवडणूक चोरण्याचा (चुनाव चोरी) कट रचत असल्याचा दावा केला. भुवनेश्वरमधील 'संविधान बचाओ समावेश' कार्यक्रमात बोलताना गांधींनी म्हटले की, बिहार विधानसभा (Bihar Elections 2025) निवडणुकीपूर्वी मतदार यादीत बदल करून ही कट कारस्थाने रचली जात आहेत. भाजपा संविधानावर हल्ला करत आहे. काल मी बिहारमध्ये होतो. जसे महाराष्ट्रात 'चुनाव चोरी' झाली, तसाच प्रयत्न बिहारमध्ये केला जात आहे. निवडणूक आयोग भाजपाची शाखा बनले आहे. स्वतःचे काम ते करत नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

महाराष्ट्रातील ‘चोरी’चा पुनरुच्चार

महाराष्ट्रात 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा उल्लेख करताना राहुल गांधी म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान 1 कोटी नव्या मतदारांची नोंद झाली, ज्यांचा तपशील निवडणूक आयोगाने दिला नाही. 'हे मतदार कोण होते, कुठून आले, हे कोणालाही माहीत नाही. आम्ही अनेकदा निवडणूक आयोगाकडे यादी व व्हिडिओ मागितले. पण त्यांनी दिले नाही. महाराष्ट्रात जी 'चोरी' झाली, तीच बिहारमध्ये होणार आहे. इंडिया आघाडी अशा कोणत्याही चोरीला होऊ देणार नाही,' असेही ते म्हणाले.

ओडिशा सरकार व गौतम अदानी यांच्यावर टीका

या भाषणात गांधींनी ओडिशा सरकारवरही सडकून टीका केली. त्यांनी राज्यातील गरीबांचे संपत्ती 'चोरली' जात असल्याचा आरोप केला. 'ओडिशा सरकारचं एकच काम आहे – गरीबांच्या हातून संपत्ती हिसकावणे. आधी बीजेडी सरकार हे करत होतं, आता भाजप करत आहे. एका बाजूला गरीब, दलित, आदिवासी, मागासवर्गीय, शेतकरी आणि मजूर आहेत, आणि दुसऱ्या बाजूला 5-6 अब्जाधीश आणि भाजप सरकार आहे,' गांधी म्हणाले.

जगन्नाथ रथयात्रा दरम्यान अदानीसाठी रथ थांबवण्यात आल्याचा दावा करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. 'अदानी ओडिशा सरकार चालवतो, अदानी नरेंद्र मोदींनाही चालवतो. जगन्नाथ यात्रा निघते तेव्हा लाखो लोक त्यात सहभागी होतात. पण त्या दिवशी अदानी आणि त्याच्या कुटुंबासाठी रथ थांबवण्यात आले. हेच ओडिशा सरकारबद्दल सर्वकाही सांगते,' असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींचे हे आरोप बिहार आणि ओडिशामधील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापवणारे ठरले आहेत. काँग्रेस आणि INDIA आघाडी भाजपाविरोधात रणधुमाळी सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.