कोरोना विषाणू (Coronavirus) साथीच्या काळात, जवळजवळ गेल्या चार महिन्यांपासून अनेक लोक घरून काम (Work From Home) करत आहेत. मात्र आता अशा लोकांना ऑफिसचे वेध लागले आहेत. हे लोक म्हणत आहे की, त्यांना आता ऑफिसची आठवण येत असून, ते त्यांच्या कार्यालयातून होणाऱ्या कामाला (Work From Office) मिस करत आहेत. ही गोष्ट एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. जेएलएलचा एशिया पॅसिफिक अहवाल ‘होम अँड अवे: द न्यू वर्क प्लेस हायब्रिड?’ (Home and away: The new workplace hybrid?) मध्ये हे उघडकीस आले आहे. यामध्ये नमूद केले आहे की, आता भारतामधील बहुतेक म्हणजेच जवळजवळ 82 टक्के कर्मचार्यांना कामावर जायचे आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर 'वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना जगभरात सुरू झाली होती, मात्र, आता कर्मचार्यांची ती अडचण बनत असल्याचे सिद्ध होत आहे. कर्मचार्यांचे म्हणणे आहे की, लॉकडाऊनमुळे कामाचे ठराविक तास नसणे, वारंवार व्हिडिओ मीटिंग्ज करणे आणि काम करण्यासाठीच्या चांगल्या पर्यायांचा अभाव यामुळे ताण उद्भवत आहे. जेएलएलच्या मते, पाच आशिया पॅसिफिक मार्केट्समध्ये मोठ्या कॉर्पोरेशनमधील, 1,500 कर्मचार्यांच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, त्यातील 61 टक्के कर्मचारी त्यांच्या ऑफिसला मिस करत आहेत. मात्र हे प्रमाण भारतापेक्षा कमी आहे. (हेही वाचा: Coronavirus पासून वाचण्यासाठी Work From Home करताय तर 'या' गोष्टींची घ्या काळजी अन्यथा होऊ शकते नुकसान)
या अहवालात असेही म्हटले आहे की, जरी कर्मचारी घरातून काम करण्याच्या स्वातंत्र्याचा आनंद घेत आहेत, मात्रे ते आता लोकांशी ‘फेस टू फेस’ होणारे संभाषण मिस करत आहेत. आशिया पॅसिफिकमधील 66 टक्के कर्मचार्यांनी सांगितले की, ते कार्यालयातील अनुभवांचे फायदे गमावत आहेत. यामध्ये लोकांशी परिचय, व्यावसायिक वातावरण आणि कामावर लक्ष केंद्रित करण्यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. 81 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की, त्यांच्याकडे ऑफिस सारख्या तंत्रज्ञानाचा अभाव आहे. यामध्ये 52 टक्के लोकांचे म्हणणे आहे की, ते ऑफिसपेक्षा घरबसल्या जास्त काम करत आहेत. कोरोना व्हायरसच्या काळात, सरासरी 68 टक्के कर्मचार्यांनी घरून काम केले आहे. यामध्ये सिंगापूरमध्ये सर्वात जास्त, 81 टक्के लोकांनी घरून काम केले आहे.