Union Finance Minister Nirmala Sitharaman | (Photo Credit: PTI)

कोरोना संकटाचा सामना करत भारताची विस्कटलेली अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत करण्यासाठी मोदी सरकार विविध योजनांचा अवलंब करत आहेत. दरम्यान यामध्ये आता यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यंदाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी दिवशी संसदेमध्ये सादर करणार आहेत. तर आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल 29 जानेवारीला सादर केला जाणार आहे. मागील वर्षभर अत्यंत आव्हानात्मक स्थितीचा सामना केल्यानंतर आता सरकार यंदाच्या अर्थसंकल्पात आर्थिक, आरोग्य, शिक्षण क्षेत्र आणि कर दात्यांना कोणत्या सुविधा देणार? कोणत्या योजना जाहीर करणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. Union Budget 2021: कोरोना विषाणूमुळे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच छापली जाणार नाहीत अर्थसंकल्पाची कागदपत्रे; अर्थमंत्री निर्मला सीतारमण सॉफ्ट कॉपीवरुन वाचतील भाषण.

दरम्यान केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार यांच्या अध्यक्षतेखाली बनवला गेलेला आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल 2020-21 यंदा शुक्रवार, 29 फेब्रुवारीला संसदेमध्ये मांडला जाईल. त्यामध्ये मागील वर्षभरातील काळातील विकासकामांचा आढावा घेतला जातो. उत्पन्न खर्चाची मांडणी केली जाते. तर सरकारने निधी कसा जमवला याची देखील त्यामध्ये माहिती दिली जाते.

आर्थिक सर्वेक्षण अहवालानंतर अर्थमंत्री देशाचा अर्थसंकल्प जाहीर करतील. 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता त्याचं वाचन सुरू होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प पेपर लेस असणार आहे. दरम्यान मंदीचा काळ, बेरोजगारी पाहता आणि देशासमोरील आर्थिक संकट पाहता यंदाच्या अर्थसंकल्पात फार मोठ्या सवलतींची, करा माफीची घोषणा होण्याची शक्यता कमी आहे. आत्मनिर्भर भारताचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेला नारा यंदाच्या अर्थसंकल्पातही उतरण्याची शक्यता दाट आहे.

यंदाचा अर्थसंकल्प 2021 तुम्ही लोकसभा वाहिनीवर, संबंधित मंत्रालयाच्या सोशल मीडिया हॅन्डल्सवर 11 वाजल्यापासून लाईव्ह पाहू शकता.