Vande Bharat Train (संग्रहित संपादित प्रतिमा)

Vande Metro To Be Operational From July: भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी देशात वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू केली होती आणि तेव्हापासून आता अनेक शहरांमधून वंदे भारत ट्रेन चालवल्या जात आहेत. आता वंदे भारत ट्रेननंतर केंद्र सरकार वंदे भारत मेट्रो (Vande Metro) सुरू करण्याच्या तयारीत आहे, याअंतर्गत वंदे भारत ट्रेनच्या धर्तीवर वंदे भारत मेट्रोचा पहिला रेक तयार करण्यात आला आहे. वंदे भारत मेट्रोची चाचणी यावर्षी जुलैमध्ये होण्याची शक्यता आहे. लवकरच ही मेट्रो कपूरथला येथील रेल्वे कोच फॅक्टरीतून चाचणीसाठी बाहेर येईल. माहितीनुसार, सुरुवातीला 50 वंदे मेट्रो सुरू केल्यानंतर, पुढे 400 मेट्रो ट्रेन सुरू करण्याची योजना आहे.

दोन मोठ्या शहरांना जोडण्यासाठी चालवण्यात येत असलेल्या इंटरसिटी एक्स्प्रेसच्या धर्तीवर ही मेट्रोही धावणार आहे. वंदे मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. वंदे भारत मेट्रो देशातील 12 मोठ्या आणि मध्यम स्थानकांवरून चालविली जाईल. वंदे भारत मेट्रो ही 12 डब्यांची ट्रेन असेल. यामध्ये बसून व उभे राहून प्रवास करण्याची सुविधा असेल.

वंदे मेट्रो गाड्या 100 ते 250 किमी अंतरापर्यंत धावतील. सुरुवातीला लखनौ कानपूर, आग्रा मथुरा, दिल्ली रेवाडी, भुवनेश्वर बालासोर आणि तिरुपती चेन्नई दरम्यान चालवण्याची योजना आहे. मात्र, यात आरक्षणाची सुविधा नसून ती अनारक्षित ट्रेन असेल. सध्या वंदे भारत मेट्रोच्या दराबाबत माहिती समोर आलेली नाही. देशातील ज्या भागात खूप गर्दी असते आणि प्रवासात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते अशा ठिकाणी ही मेट्रो धावेल अशी अपेक्षा आहे. (हेही वाचा: Lady Cop Saves Man: चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशांचा पाय घसरला, महिला रेल्वे पोलिसांने वाचवले जीव)

दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा त्रास पाहून रेल्वेने वंदे मेट्रो चालवण्याचा विचार केला आहे. देशातील पहिली वंदे मेट्रो ट्रेन जुलै महिन्यात रुळांवर धावण्यास सुरुवात होणार आहे. सुरुवातीला दोन ते तीन महिने ती चाचणी तत्त्वावर चालवली जाईल, त्यानंतर चाचणी यशस्वी झाल्यास अन्य मार्गांवरही चालवण्याचा निर्णय घेतला जाईल. सध्या तरी वंदे मेट्रो ट्रेनच्या चाचणीसाठी मार्ग निवडलेला नाही. दरम्यान, वंदे मेट्रोमधील आसनांमधील रुंद मार्गामुळे, प्रत्येक कोचची क्षमता 280 प्रवासी असेल, ज्यामध्ये 100 आसन क्षेत्रांचा समावेश आहे. वंदे मेट्रोला प्रत्येक डब्यात 14 सेन्सर्ससह स्वयंचलित दरवाजे, शौचालये, वातानुकूलन आणि धूर शोधण्याची यंत्रणा देखील असेल.