Uttarakhand: मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी दिला पदाचा राजीनामा; जाणून घ्या कोण होऊ शकते उत्तराखंडचे नवे Chief Minister
Trivendra Singh Rawat (संग्रहित संपादित प्रतिमा)

उत्तराखंडचे (Uttarakhand) मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत (Trivendra Singh Rawat) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी संध्याकाळी चार वाजता त्यांनी राज्यपाल बेबी राणी मौर्य यांची भेट घेऊन आपला राजीनामा सादर केला. आता थोड्याच वेळात त्रिवेंद्रसिंग रावत यांची पत्रकार परिषद आहे. सोमवारी दिल्लीत हाय कमांडसोबतच्या बैठकीनंतरच उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री बदलले जातील हे निश्चित झाले. अनेक भाजपा आमदारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर त्रिवेंद्रसिंग रावत मुख्यमंत्री राहतील की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात होती. गेल्या दोन दिवसांपासून हाय कमांड यावर करीत होते. त्यानंतर मात्र त्रिवेंद्रसिंग रावत हे पदावरून पायउतार होतील याबाबतच्या चर्चा सुरु झाल्या.

सीएम त्रिवेंद्र यांनी राजीनामा दिल्यानंतर खासदार अनिल बलूनी, कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज आणि केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री डॉ. रमेश पोखरीयल निशंक शर्यतीत आघाडीवर होते. परंतु, मंगळवारी दुपारी अचानक पुष्पकर धामी आणि राज्याचे उच्च शिक्षणमंत्री डॉ. धनसिंग रावत यांचीही नावे चर्चेत आली. सरकारच्या वतीने हेलिकॉप्टर पाठवून डॉ. रावत यांना देहरादून येथे बोलावण्यात आले आहे. बुधवारी भाजप विधिमंडळाची बैठकदेखील प्रस्तावित आहे. राज्याच्या पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा बैठकीतच होण्याची शक्यता आहे. 2000 मध्ये राज्य स्थापनेपासून कॉंग्रेसचे नारायण दत्त तिवारी वगळता कोणत्याही मुख्यमंत्र्यांना आपला कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही.

त्रिवेंद्रसिंग रावत यांच्याविरूद्ध त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी काही काळ मोर्चेबांधणी केली होती. आमदारांची नाराजी लक्षात घेता पक्षाचे उत्तराखंड प्रभारी दुष्यंत गौतम आणि केंद्रीय पर्यवेक्षक रमण सिंह यांना देहरादून येथे पाठविण्यात आले. तेथे त्यांनी नाराज असलेल्या आमदारांशी बैठक घेतली आणि त्यांचा आक्षेप ऐकला पण आमदारांचे मन राखण्यात ते अपयशी ठरले. त्यानंतर सीएम त्रिवेंद्र स्वत: दिल्ली येथे गेले आणि त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. (हेही वाचा: ममता दीदींनी बंगालचा विश्वासघात केला; पंतप्रधान मोदींचा ‘तृणमूल’ काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल)

दरम्यान, उत्तराखंड विधानसभेबद्दल बोलायचे झाले तर, येथे एकूण आमदारांची संख्या 70 आहे. त्यापैकी भाजपाकडे 56 आमदार आहेत तर कॉंग्रेसचे 11 आणि दोन आमदार अपक्ष आहेत. एक जागा अद्याप रिक्त आहे.