उत्तर प्रदेशमधील कानपूर (Kanpur) जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातील निष्काळजीपणाचे एक मोठे प्रकरण समोर आले आहे. या ठिकाणी एका महिलेने शौचालयात (Hospital Toilet) मुलाला जन्म दिला. परंतु कमोडमध्ये अडकल्याने मुलाचा मृत्यू झाला. प्रत्यक्षात त्यावेळी मदतीसाठी कोणताही कर्मचारी उपलब्ध नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार, हसीन बानो नावाच्या महिलेला प्रसूतीसाठी हॅलेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रात्री बानो यांना शौचालयात जायचे होते. त्यांनी कर्मचाऱ्यांना हाका मारल्या, बोलावले. पण एकही कर्मचारी मदतीसाठी आला नाही.
यानंतर त्या एकट्या कशाबशा शौचालयात पोहोचल्या व त्यांनी त्याठिकाणी मुलाला जन्म दिला. धक्कादायक गोष्ट म्हणजे, प्रसूती झाल्यानंतर हे मूल कमोडमध्ये पडले आणि त्यात अडकले. या दरम्यान महिला मदतीसाठी ओरडत राहिली पण बराच वेळ तेथे कोणीही आले नाही. नंतर एक स्टाफ नर्स तेथे पोहोचली आणि तिने महिलेच्या पतीला घडलेल्या घटनेची माहिती दिली. महिलेचा पती तिथे पोहोचला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या निष्पाप बाळाचा तोपर्यंत मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात एकच खळबळ उडाली. रुग्णालयात रात्री उशिरा कोणताही कर्मचारी नसल्यामुळे लोकांचा रोष उफाळून आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांचा निष्काळजीपणाही या प्रकरणात समोर येत आहे. प्रकरण वाढत असल्याचे पाहून वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यासह, ते म्हणाले की या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. असा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. (हेही वाचा: Singhu Border Murder: शेतकरी आंदोलन स्थळी हत्या; हात, पाय तोडलेल्या अवस्थेत बॅरीकेटला लटकवले शव)
त्याचवेळी आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी म्हणाले की, या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यावर जिल्हा दंडाधिकारी विशाल जी अय्यर यांनीही कठोर भूमिका घेतली आणि मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. अहवाल आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.