Doctor | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) फिरोजाबाद (Firozabad) जिल्ह्यात आरोग्य विभागाचा अमानवी चेहरा पाहायला मिळाला आहे. याठिकाणी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे जन्मताच एका बालकाचा मृत्यू झाला आहे. एचआयव्ही पॉझिटिव्ह (HIV Positive) महिलेला प्रसूती वेदना होऊ लागल्याने नातेवाईकांनी तिला शासकीय रुग्णालयात नेले होते. परंतु तिथे ही महिला एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे डॉक्टरांना समजल्यावर त्यांनी तिला स्पर्श करण्यास नकार दिला. ही महिला बराच वेळ वेदनेने तडफडत राहिली, मात्र तरीही डॉक्टर तिच्याकडे फिरकले नाहीत.

ही बाब सीएमएसला कळताच त्यांनी डॉक्टरांना फटकारले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. प्रसूतीनंतर लगेचच महिलेच्या मुलाचा मृत्यू झाला. महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, प्रसूती वेदना होत असल्याने मुलीला प्रथम खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी 20 हजार रुपये मागितले. पैशाअभावी तिला मेडिकल कॉलेजमध्ये आणले. इकडे डॉक्टरांना महिला एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे सांगितल्यावर त्यांनी मुलीला हातही लावला नाही. ती स्ट्रेचरवर वेदनेने ओरडत होती.

त्यानंतर कुटुंबीयांनी मेडिकल कॉलेजच्या प्रभारींना फोन केला. त्यांच्या मध्यस्थीनंतर रात्री 9.30 वाजता शस्त्रक्रिया करण्यात आली. सुमारे सहा तास मुलीला प्रसूती वेदना होत असल्याचे पालकांनी सांगितले, परंतु एकही डॉक्टर तिची काळजी घेण्यास तयार नव्हता. दुसरीकडे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्या संगीता अनेजा यांनी सांगितले की, महिला दुपारी तीनच्या सुमारास रुग्णालयात आली होती. तिच्यासोबत असलेल्या लोकांनी ती एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याची माहिती डॉक्टरांना किंवा कोणालाही दिली नाही.

त्यांनी पुढे सांगितले की, याबाबत त्या सर्वांशी बोलल्या. स्टाफने त्यांना सांगितले की, महिलेची नियमित रुग्णाप्रमाणे तपासणी करण्यात आली. रात्री नऊच्या सुमारास महिलेची प्रसूती झाली, परंतु तिच्या बाळाचा मृत्यू झाला. घडल्या प्रकारची चौकशी झाली. तपास अहवालही आला आहे. यामध्ये जर कोणी चुकीचे केले असेल तर आम्ही कारवाई करू. (हेही वाचा: Crime: आधी 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, नंतर लग्नासाठी लावला तगादा, छळ केल्याप्रकरणी आरोपी अटकेत)

दुसरीकडे, नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनशी संबंधित एका एनजीओच्या फील्ड ऑफिसरने सांगितले की, महिलेला दुपारी तीन वाजता हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. जेव्हा त्यांनी तिला स्ट्रेचरवर ठेवले तेव्हा एकाही कर्मचाऱ्याने तिला हात लावण्यास किंवा तिची तपासणी करण्यास नकार दिला. रात्री नऊ वाजेपर्यंत महिलेला वेदना होत राहिल्या, तरीही तिला कोणी हात लावला नाही.