Agustawestland scam: बहुचर्चीत ऑगस्टा वेस्टलँड (Agustawestland) हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला ब्रिटीश नागरिक क्रिश्चियन मिशेल ( Christian Michel) भारताच्या हाती लागला आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल (Under Doval ) यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली. भारताची तपास यंत्रणा मिशेल याला दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर घेऊन गेली. तेथून त्याला भारतात आणल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. VVIP चॉपर हेलिकॉप्टर खरेदीमध्ये झालेल्या 3,600 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात तो भारताला हवा होता. जानेवारी 2014मध्ये भारताने हा व्यवहार रद्द केला होता. केंद्रीय अन्वेषण विभाग (Central Bureau of Investigation) म्हणजेच CBIने दिलेल्या माहितीनुसार या व्यवहारात 2,666 कोटी रुपयांचे नुकसान होत होते. हा व्यवहार 8 फेब्रुवारी 2010मध्ये करण्यात आला होता. या व्यवहारांतर्गत 556.262 मिलियन यूरोमध्ये 12 हेलिकॉप्टर खरेदी केले जाणार होते.
आखाती देशांकडे प्रत्यार्पणाची मागणी
सीबीआयने सांगितले की, क्रिश्चियन मिशेलला भारतात आणण्यासठी राबवलेल्या मोहिमेची जबाबदारी सीबीआय संचालक एम नागेश्वर राव आणि संयुक्त संचालक साई मनोहर यांच्या चमूवर सोपवण्यात आली होती. नेव्हेंबरमध्ये सेशन न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा आदेश कायम राखत मिशेलच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा करुन दिला होता. खलीज टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, 54 वर्षीय मिशेल याला दुबई विमानतळावरुन भारतात नेण्यात आले. 2017मध्ये भारताने आखाती देशांकडे क्रिश्चियन मिशेलचे प्रत्यार्पण करण्याची मागणी केली होती. सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) या प्रकरणाचा तपास करत होते.
क्रिश्चियनच्या वकिलाचे आरोप सीबीआयने फेटाळले
ईडीने (Enforcement Directorate) जून 2016मध्ये मिशेल विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. यात सांगण्यात आले होते की, ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात त्याने तब्बल 225 कोटी रुपये मिळवले. ईडीने पुढे असेही म्हटले होते की, हा पैसा इतर कारणांसाठी नव्हे तर, कंपनीकडून १२ हेलिकॉप्टर खरेदीचा व्यवहार आपल्या बाजूने व्हावा यासाठी देण्यात आलेली रक्कम होती. ही एक प्रकारची लाचच होती. फेब्रुवारी 2017मध्ये त्याला UAEमध्ये अटक करण्यात आली होती. मिशेलच्या वकीलाने आरोप केला होता की, केंद्रीय तपास यंत्रणा (CBI) आपल्या आशिलावर दबाव टाकत आहे. मात्र, सीबीआयने क्रिश्चियनच्या वकिलाचे आरोप फेटाळून लावले आहेत. (हेही वाचा, नीरव मोदी, पीएनबी घोटाळा: आयकर विभागाला ८ महिन्यांपूर्वीच होती कल्पना तरीही बाळगले मौन)
हेलिकॉप्टर खरेदी व्यवहार रद्द
CBIप्रवक्ते अभिषेक दयाळ यांनी जूनमध्ये म्हटले होते की, मिशेल याने आपला गुन्हा कबूल करावा यासाठी सीबीआय त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकत नाही. ऑगस्टा वेस्टलॅंडकडून भारतासाठी व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे पुढे आले होते. या व्यवहारात काही गडबड असल्याचे ध्यानात येताच हेलिकॉप्टर खरेदी रद्द करण्यात आली. कंपनीसोबत झालेल्या करारानुार 12 VVI हेलिकॉप्टर खरेदी केले जाणार होते. मात्र, गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर 1 जानेवारी 2014रोजी ही खरेदी रद्द करण्यात आली.
इंटरपोल रेड कॉर्नर नोटीस जारी
दरम्यान, या प्रकरणात एकूण तीन आरोपी असून, त्यातील एकाची आगोदरपासूनच चौकशी सुरु आहे. गुइदो हाश्के आणि कार्लो गेरेसा हेसुद्धा या प्रकरणात सहभागी आहेत. कोर्टाने दोघांना फरार घोषीत केल्यानंतर तपास यंत्रणांनी या दोघांविरोधात इंटरपोल रेड कॉर्नर नोटीस जारी केली होते. ईडीने केलेल्या तपासात पुढे आले होते की, क्रिश्चियन मिशेल याने त्याच्या दुबईस्थित कंपनी ग्लोबल सर्व्हिसद्वारा दिल्लीतील एका कपनीला सहभागी करुन घेत ऑगस्टा वेस्टलॅंडकडून लाच घेतली होती. यात भारतातील दोन लोक सहभागी होते. मात्र, मिशेलने आपल्यावरील ओरोप नाकारले होते.