
तामिळनाडू (Tamil Nadu) राज्यातील जावडी (Javadi Hills) येथील जंगल आणि डोंगराळ प्रदेशात हरणाची शिकार (Deer Hunting) करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. भारतामध्ये वन्य प्राण्यांची शिकार करणे कायद्याने गुन्हा आहे. असे असतानाही काही मित्र शिकारीसाठी गेले होते. त्यांनी हरीण मारण्यासाठी सापळा रचून बंदूक ताणली होती. दरम्यान, हरणावर निशाणासाधत असताना मित्राच्या बंदूकीतून सुटलेली गोळी नजरचुनीने मित्राच्याच शरीरात घुसली. ज्यामळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, जमुनामरथूर (Jamunamarathur) येथील तघे दिवाळीनिमित्त (Diwali 2023) शिकार करण्याच्या उद्देशाने डोंगराळ प्रदेशात बेकायदेशीरपणे गेले होते. शक्तीवल, प्रकाश आणि शक्तीवसन अशी या तिघांची नावे आहेत. त्यांना हरणाची शिकार करायची होती. दरम्यान, हरणाला लक्ष्य करताना निशाणा चुकला आणि मित्राच्याच बंदूकीतून सुटलेली गोळी चक्क दुसऱ्या मित्राच्या शरीरात घुसली. ज्यामुळे त्याला आपले प्राण गमवावे लागले.
शिकारीसाठी दबा धरुण बसलेल्या शक्तीवल, प्रकाश आणि शक्तीवसन यांना हरीण जवळपास असल्याची चाहूल लागली. त्यांनी बंदूकीचा बार काढण्याची पूरेपूर तयारी केली. दरम्यान, हरीण टप्प्यात येताच शक्तीवासन याने बंदूकीतून गोळी झाडली. पण त्याचा नेम हुकला. गोळी चक्क प्रकाश शरीरात घुसली. ज्यामुळे तो जागीच कोसळला आणि पुढच्या काहीच मिनीटात त्याचा मृत्यू झाला. याच घटनेत प्रकाशच्याही चेहऱ्याला गोळी लागली. ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा जबडाही तुटला.
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार धक्कादायक असे की शक्तीवेल आणि त्याच्या कुटुंबीयांनी पुरावा नष्ट करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पोलीस किंवा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कोणतीही कल्पना न देता त्यांनी त्याचा मृतदेह चक्क जमीनीत गाढण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, या घटनेचा सुगावा लागताच पोलिसांनी शक्तीवेल याचा मृतदेह मिळवला आणि तो तिरुवन्नामलाई येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. पोलिसांनी या प्रकरणात दोघा संशयीतांना ताब्यात घेतले असून तिसऱ्या शोध सुरु आहे.
शिकार करणे हा एक छंद किंवा खेळ मानला जात असे. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी देशात मोठ्या प्रमाणावर वन्य प्राण्यांची शिकार केली जात असे. मात्र, वन्य प्राण्यांची घटती संख्या पाहता आणि जैवविविधताच टीकवून ठेवण्यासाठी भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर शिकारीवर बंदी घालण्यात आली. भारत सरकारने वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 अंतर्गत शिकार करण्यावर बंदी घातली आहे. मात्र, मुख्य वन्यजीव वॉर्डन एखाद्या वन्य प्राण्याची शिकार करण्यास काही प्रकरणात अगदीच अपवादात्मक स्थितीत परवानगी देऊ शकतो. जसे की, एखादा वन्यजीव, प्राणी मानवी जीवनासाठी धोकादायक बनला असेल किंवा तो इतका अक्षम किंवा आजारी असेल की तो बरा होऊ शकत नाही. अशा स्थितीत त्याची शिकार करण्यास परवानगी दिली जाते.