तामिळनाडू राज्यातील अरिवझागन (Arivazhagan) नामक 65 वर्षीय व्यक्तीची कामगिरी पाहून डॉक्टरही थक्क झाले. कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा अथवा कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास नागरिकांना मनाई आहे. त्यामुळे सहाजिकच नागरिकांच्या प्रवासावर मर्यादा आल्या आहेत. अशा स्थितीत अरिवझागन यांनी आपल्या पत्नीला सायकलवर घेऊन तब्बल 130 कोलोमीटर इतके पार केले. अरिवझागन यांची पत्नी कर्करोगाने त्रस्त आहेत. त्यांच्यावर केमोथेरपी (Chemotherapy) द्वारे उपचार घ्यावे लागतात.
अरिवझागन हे एक मोलमजूरी करुन पोट भरणारे मजूर आहेत. त्यांची पत्नी मंजूळा या कर्करोगाने ग्रस्त आहेत. त्यांना कोमोथेरपीद्वारे उपचार घ्यावे लागतात. लॉकडाऊन असल्यामुळे आयत्या वेळी त्यांना रुग्णवाहिका अथवा इतर कोणतेच वाहन उपलब्ध झाले नाही. मग त्यांनी थेट पत्नीला सायकलच्या कॅरेजवर बसवले. स्वत:सोबत बांधले आणि रुग्णालयाचा मार्ग धरला. हा मार्ग साधा नव्हाता. तब्बल 130 किलोमीटरचे अंतर होते.
घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, 30 मार्च 2020 या दिवशी अरिवझागन पहाटे 4.45 वाजता आपली पत्नी मंजळुा यांच्यासोबत निघाले. त्यांना सायकलच्या कॅरेजवर बांधले. सायकल चालवताना मंजूळा या खाली पडू नये म्हणन सायकलवरुन खाली न उतरता त्यांनी 130 किलोमीटर प्रवास केला. दिवसभर सायकल चालवून दोघेही रात्री 10.15 वाजता पुद्दुचेरी येथील रुग्णालयात पोहोचले. या संपूर्ण कालावधीत अरिवझागन यांनी केवळ 2 तास विश्रांती घेतली. बाकीचा सर्व काळ ते सायकलवरुन प्रवास करत राहिले. (हेही वाचा, बिहार: तीन वर्षाच्या मुलाला छातीला कवटाळून धावत राहीली आई, नाहीच मिळाली रुग्णवाहिका; अखेर मृत्यू (Video))
अरिवझागन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही रुग्णालयात पोहोचलो तेव्हा OPD आणि स्थानिक कर्करोग उपचार केंद्र दोन्ही बंद झाली होती. मात्र, रुग्णालयातील अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रवासाबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यांनी मंजुळा यांच्यावर उपचार केले.
पुढे बोलताना अरिवझागन यांनी सांगितले की, ते 30 मार्च रोजी रुग्णालयात पोहोचले होते. 31 मार्च रोजी उपचार झाले. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना घरी पोहोचण्यासाठी मदत केली. तसेच, एक महिन्याचे औषधही दिले.अरिवझागन यांनी सांगितले की, डॉक्टरांनी रुग्णवाहिका आणि रस्त्यात गरज पडल्यास खर्चण्यासाठी पैसेही दिले. तसेच, डॉक्टरांनी सांगितले की, जर यापुढे कधीही उपचाराची गरज पडली तर फक्त एक कॉल करा. रुग्णालयाची रुग्णवाहिका त्यांना घ्यायला येईल. अरिवझागन म्हणतात की मला अजूनही विश्वास बसत नाही की, मी 130 किलोमीटर सायकल कशी चालवली.