सामान्य माणसाला झटका! कपडे धुणे व अंघोळ करणे झाले महाग; HUL कडून Surf Excel, Rin, Lux, Lifebuoy च्या किंमतीमध्ये मोठी वाढ
Hindustan Unilever Ltd. (Photo Credits: ANI)

कोरोना विषाणू (Coronavirus) संकटाच्या दरम्यान, सामान्य व्यक्तीला अनेक आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. पेट्रोल-डीझेलचे भाव वाढले आहेत. घरगुती एलपीजीच्या किंमती जवळजवळ दर महिन्यात वाढत आहेत. अशात आता लोकांना आंघोळ करणे आणि कपडे धुणेही महाग झाले आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) ने आपल्या उत्पादनांच्या किंमती वाढवल्या आहेत. ही एक भारतीय कंपनी असून ती सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात लागणारी उत्पादने (FMCG) तयार करते. यामध्ये लक्स, सर्फ एक्सेल आणि रिनसह इतर काही उत्पादनांचा समावेश आहे.

आता कंपनीने आपल्या उत्पादनांच्या किंमती 3.5 ते 11 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. कंपनीने कच्च्या मालाच्या किंमतीतील वाढीचा भार ग्राहकांवर टाकला आहे. इंधन महाग झाल्याने खर्चात वाढ झाल्यामुळे देशातील बहुतेक कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या किंमती वाढवत आहेत. हिंदुस्थान युनिलिव्हरने बहुतेक डिटर्जंट व्हरायटीच्या किमतीत वाढ केली आहे, परंतु जास्तीत जास्त दरवाढ हाय-एंड श्रेणी सर्फ एक्सेलमध्ये केली गेली आहे.

गेल्या महिन्यात HUL ने सर्फ एक्सेल इजी वॉशच्या 3 किलो पॅकची किंमत 10 टक्क्यांनी वाढवून 330 रुपये केली. त्याच वेळी, त्याच्या 1 किलो पॅकची किंमत 9 टक्क्यांनी वाढवून 109 रुपये करण्यात आली. त्याचप्रमाणे आता सर्फ एक्सेल क्विक वॉश 1 किलो पॅकची किंमत 11 टक्क्यांनी वाढवून 200 रुपये करण्यात आली आहे.

अशी आहे दरवाढ –

  • रिन डिटर्जंट पावडरच्या 1 किलो पॅकची किंमत 8 टक्क्यांनी वाढवून 70 रुपये करण्यात आली आहे.
  • व्हीलच्या 1 किलो पॅकची किंमत 3.5 टक्क्यांनी वाढवून 57 रुपये करण्यात आली आहे.
  • सर्फ एक्सेल बारच्या 50 ग्रॅमची किंमत आता 30 रुपये आहे, जी आधी 29 रुपये होती.
  • विम बार 300 ग्रॅमची नवीन किंमत आता 22 रुपये आहे, जी आधी 20 रुपयांना उपलब्ध होती.
  • लक्स साबण आणि लाइफ बॉय साबणाच्या किंमती 8-12 टक्क्यांनी वाढल्या आहेत. (हेही वाचा: Salary Hike: भारतीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; 2022 मध्ये पगारात होऊ शकते 9.4 टक्के वाढ)

साबण तयार करण्यासाठी पाम तेलाचा वापर केला जातो. इंडोनेशिया आणि मलेशियामधून पाम तेल भारतात आयात केले जाते. भारत पामतेलाच्या एकूण आयातीत 70 टक्के खरेदी इंडोनेशियाकडून करतो. त्याच वेळी मलेशियातून 30 टक्के आयात केली जाते.