कोरोना व्हायरस (Coronavirus) साथीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करीत भारतीय कंपन्यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. म्हणूनच, साथीच्या रोगाचा धोका असूनही भारतीय कंपन्या यावर्षी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी 8.8 टक्क्यांनी वाढ करतील, त्याचबरोबर पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये वेतन वाढ 9.4 टक्के होईल. एका सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. ही चार वर्षातील सर्वोच्च सरासरी वाढ असेल. इकोनॉमिक रिकव्हरी वाढवणे चांगल्या लोकांना आकर्षित करण्याच्या स्पर्धेमुळे, एट्रिशन रेट 20 टक्क्यांपर्यंत जात असल्याने कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन अधिक वाढवणे अपेक्षित आहे.
मंगळवारी जाहीर झालेल्या एओनच्या 26 व्या वार्षिक वेतन वाढीच्या सर्वेक्षणानुसार (Aon’s 26th Annual Salary Increase Survey) बहुतेक कंपन्या 2022 बद्दल आशावादी आहेत. पुढील वर्षी 98.9 टक्के कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करतील. त्याचबरोबर 2021 मध्ये 97.5 टक्के कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्याचे म्हटले आहे. सर्व्हेक्षणामध्ये असे दिसून आले आहे की जवळजवळ सर्व क्षेत्रातील कंपन्या उत्तम कामगिरी करत आहेत आणि भारतीय कंपन्या रिकव्हरीच्या मार्गावर आहेत. बहुतेक कंपन्या मानतात की 2021-22 मध्ये वेतन वाढ 2018-19 च्या पातळीवर पोहोचेल. (हेही वाचा: EPFO: पीएफ धारकांसाठी खुशखबर; दिवाळीपूर्वी खात्यावर जमा होऊ शकते 8.5 टक्के व्याज, 6 कोटी लोकांना होणार फायदा)
2020 मध्ये वेतन वाढ 6.1 टक्के होती. ती 2021 मध्ये 8.8 टक्के आणि 2022 मध्ये 9.4 टक्के पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. अशाप्रकारे ती 2018 आणि 2019 च्या पूर्व-महामारी पातळीच्या बरोबरीची असेल. या सर्वेक्षणात 39 उद्योगांशी संबंधित सुमारे 1,300 कंपन्यांच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले आहे. सर्वेक्षणानुसार, पुढील वर्षी आयटी क्षेत्रातील पगारात सर्वाधिक सरासरी 11.2 टक्के वाढ दिसून येईल. त्यानंतर व्यावसायिक सेवा आणि ई-कॉमर्स 10.6 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील वेतन 8.8 टक्क्यांनी वाढू शकते, जे या वर्षी 6.2 टक्के आहे.
दरम्यान, सर्वेक्षणात म्हटले आहे की, साथीच्या आजारामुळे कंपन्यांचा डिजिटल विश्वातील विस्तार वाढला आहे आणि अल्पावधीत डिजिटल प्रतिभेसाठी 'युद्ध' सुरू झाले आहे. म्हणूनच पगाराच्या बजेटमध्ये वाढ होत आहे.