एकादशीला यान लाँच केल्याने अमेरिकेची अंतराळ मोहीम यशस्वी; संभाजी भिडे यांचा अजब दावा
Sambhaji Bhide (Photo Credits: PTI, File Image)

भारतीय अंतराळ संशोधन केंद्र (ISRO) , चांद्रयान 2 (Chandrayaan 2),  नासाचे (NASA)  येऊ घातलेले प्रकल्प हे सर्व विषय सद्य घडीला बहुचर्चित आहेत. जनसामान्यांपासून ते बड्या दिग्गजांपर्यंत प्रत्येकजण यावर आपली विशेष टिपण्णी देत आहे. अशातच शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide)  यांच्या एका अजब दाव्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले . भिडे यांनी एका भाषणादरम्यान इस्रोच्या चांद्रयान 2 मोहिमेवर भाष्य केले, एवढ्यावरच न थांबता अमेरिकेच्या अंतराळ मोहिमेचा दाखला देत, नासाने एकादशीला (Ekadashi) यान अंतराळात सोडलं आणि म्ह्णूनच त्यांना यश मिळालं असेही भिडे म्हणाले. वास्तविक एकादशीच्या दिवशी ग्रहांची स्थिती अनुकूल असते म्हणून अमेरिकेला याचा फायदा झाला असे भिडे यांना सुचवायचे होते, मात्र या विधानावरून सर्वत्र त्यांची खिल्ली उडवायला सुरुवात झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, दरवर्षी नवरात्रीत शिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात येते . यंदाच्या या कार्यक्रमाच्या तयारीसाठी नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये भाषण देताना भिडे यांनी हा विचित्र दावा केला. ब्रह्मांडातील नक्षत्रांची स्थिती एकादशीला संतुलित असते. अमेरिकेने एकादशीच्या दिवशी त्यांचे यान अंतराळात सोडल्याने त्यांची मोहीम यशस्वी झाली. (संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यासह 58 जणांना कोरेगाव-भिमा परिसरात बंदी)

खरंतर भारतीय कालमापन पद्धतीत एका सेकंदाचा हजारावा भाग मोजण्याची क्षमता आहे. यापूर्वी चंद्रावर उपग्रह सोडण्याचे अमेरिकेचे 38 प्रयत्न अयशस्वी ठरले. या पार्श्वभूमीवर नासाच्या वैज्ञानिकांनी भारतीय कालमापन पद्धतीचा अभ्यास केला आणि एकादशीच्या दिवशी ही चांद्रमोहीम राबवून यश मिळवले. त्यामुळे ही मोहीम भारतीय कालमापन पद्धतीमुळे शक्य झाली असेही भिडे म्हणाले

दरम्यान, इस्रोची महत्वकांक्षी मोहीम चांद्रयान 2  ही शेवटच्या टप्प्यात असताना अचानक विक्रम लँडरशी संपर्क तुटला होता, तुर्तास या लँडरचा ठावठिकाणा शास्त्रज्ञांना कळला असून संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या मध्ये भिडे यांचा दावा किती योग्य आहे हे माहित नसले तरीही संपूर्ण भारतीयांचे लक्ष या मोहिमेकडे लागून आहे.