भीमा कोरेगांव हिंसाचार (Photo Credits: PTI)

भीमा – कोरेगाव हिंसाचारा (Bhima-Koregaon Violence) ला आता एक वर्ष पूर्ण होईल. एक जानेवारी 2018 मध्ये ही हिंसा भडकली होती. या पार्श्वभूमीवर येत्या एक जानेवारी रोजी होणाऱ्या जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या सुरक्षिततेसाठी संभाजी ऊर्फ मनोहर भिडे, मिलिंद एकबोटे, कबीर कला मंच कार्यकर्त्यांसह एकूण 58 जणांना 31 डिसेंबर व एक जानेवारी रोजी कोरेगाव-भिमा, वढू, पेरणेफाटा व सणसवाडी परिसरात येण्यास प्रवेशबंदी केली आहे. यावर्षी उफाळलेल्या हिंसाचाराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने कोरेगाव भीमा येथील जयस्तंभ परिसरातील जमीन दोन दिवसांसाठी प्रशासनाच्या ताब्यात देण्यास मान्यता दिली आहे.

कोरेगाव – भीमा परिसरात यावर्षी कोणती दुर्घटना घडू नये म्हणून पोलीस आता सतर्क झाले आहेत. सीआरपीसी कलम 144 अंतर्गत 58 जणांना नोटीसा बजावल्या असून, सीआरपीसी 177 नुसार 188 जणांना दुसरीकडे हलविले आहे. याचसोबत 29 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरातील इंटरनेट सेवाही ठप्प करण्यात येणार आहे. (हेही वाचा : कोरेगाव-भीमा हिंसाचारासाठी मुख्यमंत्रीही जबाबदार, आयोगासमोर बोलावून त्यांचे जबाब नोंदवावेत)

यावर्षीचा कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी केलेल्या तयारीबद्दल पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, ‘गेल्या 2 महिन्यांपासून आम्ही यासाठीची तयारी करत आहोत. 5 ते 10 लाख लोकांना व्यवस्थित हाताळता येईल, अशी आम्ही तयारी केली आहे. विजयस्तंभ आणि आसपासच्या 7 ते 8 किलोमीटरच्या परिसरात CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहे. तसेच सभांमध्ये प्रक्षोभक आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या भाषणांवर बंदी घालण्यात आली आहे.’ गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा आणि परिसरात 29 डिसेंबरपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.