Kolkata (Photo Credit : Pixabay)

Kolkata Safest City in India: पुन्हा एकदा 'सिटी ऑफ जॉय' नावाने ओळखले जाणारे कोलकाता (Kolkata) शहर संपूर्ण देशात सुरक्षित शहर (Safest City in India) म्हणून उदयास आले आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) जारी केलेल्या वार्षिक अहवालातून ही बाब समोर आली आहे. कोलकात्याला सलग तिसऱ्यांदा हे स्थान मिळाले आहे. मात्र कोलकाता हे महिलांसाठीही सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित होणारी आकडेवारीही समोर आली आहे. या वर्षी भारतातील महिलांवरील गुन्ह्यांचे प्रमाण 4% वाढले आहे. कोलकात्याबद्दल बोलायचे तर, 2021 मध्ये कोलकाता येथे महिलांविरोधातील 1,783 गुन्ह्यांची नोंद झाली होती, तर 2022 मध्ये ती वाढून 1,890 झाली आहे.

कोलकाता येथे प्रति लाख लोकसंख्येमागे सर्वात कमी दखलपात्र गुन्हा नोंदवला गेला आहे. दखलपात्र गुन्हा म्हणजे ज्यावर भारतीय दंड संहिता आणि विशेष आणि स्थानिक नियमांनुसार गुन्हा नोंदवला जातो. आकडेवारीनुसार, शहरात 2022 मध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे 86.5 दखलपात्र गुन्हे नोंदवले गेले. पुण्यात 280.7 तर हैदराबादमध्ये 299.2 गुन्हे दाखल झाले आहेत.

दुसरीकडे, अहवालानुसार, 2021 मध्ये कोलकातामध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे 103.4 दखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली. तर पुण्यात 256.8 आणि हैदराबादमध्ये 259.9 दखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 20 लाख लोकसंख्या असलेल्या 19 शहरांची तुलना केल्यानंतर ही क्रमवारी जाहीर करण्यात आली. ईस्टर्न मेट्रोपोलिसच्या म्हणण्यानुसार कोलकाता शहरातील हिंसक गुन्ह्यांमध्येही यंदा घट झाली आहे. यावर्षी केवळ 34 खुनाचे गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या 45 वर्षांत पहिल्यांदाच असे घडले आहे. (हेही वाचा: Maharashtra Suicide Cases: देशात 2022 मध्ये महाराष्ट्रात झाल्या सर्वाधिक आत्महत्या; रोजंदारीवर काम करणारे सर्वात असुरक्षित: NCRB Data)

महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले तर, मुंबई आणि पुण्याच्या तुलनेत नागपूर हे महिलांसाठी सुरक्षित शहर म्हणून उदयास आले आहे. आकडेवारीनुसार, मुंबई आणि पुण्याच्या तुलनेत नागपुरात महिलांविरोधातील गुन्ह्यांची संख्या कमी आहे. देशाची राजधानी दिल्ली महिलांसाठी सर्वात असुरक्षित शहर ठरले आहे. एनसीआरबी अहवाल 'Crime in India 2022' हा 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थांकडून गोळा केलेल्या डेटावर आधारित आहे.