Maharashtra Suicide Cases: देशात 2022 मध्ये महाराष्ट्रात झाल्या सर्वाधिक आत्महत्या; रोजंदारीवर काम करणारे सर्वात असुरक्षित: NCRB Data
Suicide | (Photo Credits: unsplash.com)

NCRB Data: नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या 2022 च्या भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्यांच्या (Suicides) ताज्या अहवालानुसार, 2021 मध्ये 1,64,033 आत्महत्यांच्या तुलनेत 2022 मध्ये 1,70,924 आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र (22,746/13.3 टक्के), तामिळनाडू (11.6 टक्के), मध्य प्रदेश (9 टक्के), कर्नाटक (8 टक्के) आणि पश्चिम बंगाल (7.4 टक्के) यांचा वाटा सर्वाधिक आहे. या दृष्टीकोनातून पाहिले तर 2022 मध्ये भारतात दर तासाला 19 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या केलेल्यांमध्ये रोजंदारी मजुरांचा वाटा सर्वाधिक 26.4 टक्के होता, तर गृहिणींचा वाटा 14.8 टक्के होता.

अहवालानुसार, 2022 मध्ये सर्वाधिक आत्महत्या दर असलेली राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सिक्कीम (43.1), अंदमान आणि निकोबार बेटे (42.8), पुडुचेरी (29.7), केरळ (28.5) आणि छत्तीसगड (28.2) यांचा समावेश आहे. देशभरातील 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त होते, तर 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी होते. बिहार, मणिपूर, नागालँड, जम्मू-काश्मीर, लक्षद्वीप आणि उत्तर प्रदेशमध्ये या बाबतीत सर्वात चांगली स्थिती होती.

अहवालानुसार, देशभरातील 18.4 टक्के आत्महत्या या आजारांमुळे झाल्या आहेत. 2022 मध्ये कृषी क्षेत्रातील आत्महत्या वाढल्या आहेत. सन 2021 मध्ये 10,881 शेतकरी आणि कृषी कामगारांच्या तुलनेत, 2022 मध्ये 11,290 शेतकरी आणि शेतमजुरांनी आपला जीव गमावला. कृषी क्षेत्रात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात (4,248 आत्महत्या), कर्नाटक (2,392 आत्महत्या) आणि आंध्र प्रदेश (917 आत्महत्या) मध्ये झाल्या आहेत. 2022 मध्ये आत्महत्या केलेल्या 5,207 शेतकऱ्यांपैकी 4,999 पुरुष तर 208 महिला होत्या. (हेही वाचा: Murder Cases In India: देशात 2022 मध्ये तब्बल 28,522 खुनाच्या गुन्ह्यांची नोंद; 70% पीडित पुरुष: NCRB)

अहवालानुसार, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, उत्तराखंड, गोवा, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, चंदीगड, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीमध्ये कृषी क्षेत्राशी संबंधित आत्महत्यांची नोंद झालेली नाही. आत्महत्या करणार्‍यांपैकी 2,166 (1.3 टक्के) ‘सरकारी नोकर’ होते, तर 11,485 (6.7 टक्के) खाजगी क्षेत्रातील उद्योगांमध्ये कार्यरत होते. याव्यतिरिक्त, 2022 मधील आत्महत्यांच्या आकडेवारीवरून असे सूचित केले गेले आहे की, त्या वर्षातील सुमारे 95 टक्के आत्महत्या वार्षिक 5 लाख रुपयांपेक्षा कमी कमावणाऱ्या लोकांनी केल्या आहेत.