
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर (Russia-Ukraine War) तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भारतात यायचे आहे. भारतातील बहुतांश लोक सुखरूप परतले आहेत. अनेकजण आपल्या पाळीव प्राण्यांसह (Pets) भारतात परतले आहेत. काही मांजर घेऊन परतले तर काही कुत्रा घेऊन आले आहेत. आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील तनुकू शहरातील मूळ रहिवासी असलेले डॉ. कुमार बंदी हे कीवपासून 850 किमी अंतरावर असलेल्या डोनबास येथे त्यांच्या घरात एका बंकरमध्ये राहत आहेत. त्यांना भारतात यायचे नाही कारण त्यांच्याकडे दोन पाळीव प्राणी आहेत.
तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल परंतु त्यांच्याकडे चक्क एक बिबट्या (Leopard) आणि दुसरा ब्लॅक पँथर (Jaguar) आहे. डॉ. कुमार हे व्यवसायाने YouTuber आहेत. त्यांच्याकडे असे दोन मोठे प्राणी असल्याने, अनेकदा त्यांना फिरायला घेऊन जात असल्याचे व्हिडिओ ते अपलोड करतात. सध्याच्या संकटाच्या काळात ते म्हणतात, ‘मला युक्रेन सोडायचे नाही कारण माझ्या पाळीव प्राण्यांची काळजी घेणारे कोणीही नसेल.’ कुमार यांच्याकडे असलेली जग्वार प्रजाती ही जगातील दुर्मिळ प्रजातींपैकी एक असल्याचा त्यांचा दावा आहे.
कुमार 15 वर्षांपूर्वी एमबीबीएस करण्यासाठी युक्रेनला गेले होते. तिथे वैद्यकीय व्यवसायी म्हणून स्थायिक झाले. यासह त्यांनी चार तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले जे प्रदर्शित झाले नाहीत. त्यांनी तेलुगू, तमिळ आणि मल्याळममधील टीव्ही मालिकांमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिका केल्या आहेत. डॉ. कुमार यांनी युक्रेनमध्येदेखील काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. कुमार यांना लहानपणापासूनच पाळीव प्राण्यांची आवड आहे.
एक तेलगू चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी ब्लॅक पँथरला पाळीव प्राणी म्हणून पाळण्यास सुरुवात केली. त्यांनी सांगितले की बंगाल वाघ किंवा एशियाटिक सिंह हे त्यांचे पाळीव प्राणी असावेत असा त्यांचा विचार होता, मात्र, अधिकाऱ्यांनी मोठ्या प्राण्यांना सांभाळण्यास त्यांच्या आर्थिक क्षमतेचे कारण देत परवानगी नाकारली. त्यांनतर त्यांनी बिबट्या आणि एक लुप्तप्राय प्रजातीचा एक जग्वार यांची निवड केली. युक्रेनमध्ये जग्वार पाळण्यास परवानाही आहे. (हेही वाचा: Operation Ganga अंतर्गत युक्रेन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी शेवटच्या टप्प्याला सुरूवात)
कुमार म्हणाले की, 'जर मी या प्राण्यांना सोडले तर ते नक्कीच मरतील आणि मी ते सहन करू शकत नाही. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची काळजी घेईन आणि जर मी मेले तर मी त्यांच्यासोबत मरेन. या लुप्त होत चाललेल्या प्रजातींचे संवर्धन करणे हा माझा मुख्य उद्देश आहे.