RBI कडून Yes Bank वर 5 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत स्थगिती; ठेवीदार खात्यातून काढू शकणार फक्त 50,000 रुपये
File image of Reserve Bank of India (RBI) | (Photo Credits: PTI)

मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या खासगी क्षेत्रातील येस बँकेवर (Yes Bank) वर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) अनेक निर्बंध लादले आहेत. आरबीआयने 5 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत येस बँकेवर स्थगिती आणली आहे. आरबीआयच्या या बंदीनंतर कोणताही खातेदार त्याच्या खात्यातून 50 हजार रुपयांहून अधिक रक्कम काढू शकणार नाही. जर एखाद्या खातेदाराचे या बँकेत एकापेक्षा जास्त खाती असतील तरीदेखील तो, 30 दिवसांच्या या संपूर्ण कालावधीत एकूण 50 हजार रुपयेच काढू शकणार आहे.वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, ही बंदी आज सायंकाळी सहा वाजल्यापासून सुरू झाली असून ती एप्रिल 3 पर्यंत सुरू राहणार आहे.

याआधी आर्थिक संकटाचा सामना करीत असलेली, येस बँक घेण्यासाठी सरकारने एसबीआय आणि इतर वित्तीय संस्थांना मान्यता दिली आहे. मुंबईत मुख्यालय असलेली येस बँक ऑगस्ट 2018 पासून संकटात आहे. त्यावेळी रिझव्‍‌र्ह बँकेने तत्कालीन बँक प्रमुख राणा कपूर यांना, 31 जानेवारी 2019 पर्यंत बॅंकेच्या कामकाजाच्या आणि कर्जाशी संबंधित त्रुटींच्या पार्श्वभूमीवर राजीनामा देण्यास सांगितले होते.

बँकेची आर्थिक स्थिती गंभीररीत्या ढासळल्याने, बँकिंग रेग्युलेशन कायदा 1949 च्या 36ACA अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा उपयोग करत, रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारशी सल्लामसलत करून, येस बँक लिमिटेडचे संचालक मंडळ 30 दिवसांसाठी बरखास्त केले आहे. तसेच एसबीआयचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी प्रशांत कुमार (Prashant Kumar) यांची येस बँकेचे अ‍ॅडमिनिस्ट्रेटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (हेही वाचा: PNB सह 10 बँकांच्या विलीनीकरणाला मंजुरी, 1 एप्रिलपासून नव्या बँका अस्तित्वात येण्याची शक्यता)

सरकारने एसबीआयला येस बँकेला मदत करण्यास सांगितल्याच्या वृत्तानंतर खासगी क्षेत्रातील बँकेचा समभाग 25.77 टक्क्यांनी वाढून, 36.85 रुपयांवर आला. एसबीआय प्रमुख रजनीश कुमार म्हणाले होते की, संकटग्रस्त येस बँक घेण्यासाठी कोटक महिंद्रा बँक सर्वात योग्य आहे. रिझर्व्ह बँकेने येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांना हद्दपार केल्यापासून बँकेचे शेअर्स सुमारे 80 टक्क्यांनी घसरेल आहेत, एकेकाळी ते प्रति शेअर 400 रुपयांवर होते.