कोरोना विषाणू (Coronavirus) संकटाच्या दरम्यान, देशभरात लसीकरण कार्यक्रम मोठ्या वेगाने सुरू आहे. दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, भारत बायोटेकची (Bharat Biotech) कोविड-19 लस कोवॅक्सिन (Covaxin) कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस (AY.1) व्हेरिएंट बरीच प्रभावी ठरली आहे. कोरोना काळात ही मोठी दिलासादायक बातमी आहे. सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या कचाट्यात आहे आणि हा व्हायरस सतत त्याची रूपे बदलत असल्याने चिंता निर्माण झाली आहे.
भारत बायोटेकने आयसीएमआर च्या सहकार्याने कोवॅक्सिनची निर्मिती केली आहे. याआधी जगभरात कोरोनाची अनेक रूपे समोर आली आहेत, यापैकी, सर्वात संसर्गजन्य प्रकार हा डेल्टा प्रकार मानला जातो. कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, संपूर्ण जगाने कोरोनाच्या डेल्टा प्रकाराचा घातक परिणाम पाहिला आहे. या प्रकारामुळे भारतात एप्रिल-मे महिन्यात हजारो लोकांचा मृत्यू झाला.
अभ्यासात असे म्हटले आहे की आयजीजी प्रतिपिंडांचे मूल्यांकन केले गेले आहे. यामध्ये, बीबीव्ही 152 लसीचा पूर्ण डोस प्राप्त करणाऱ्या व्यक्तींमध्ये कोविड -19 ची शक्यता संपुष्टात आली आहे. यात डेल्टा, डेल्टा AY.1 आणि B.1.617.3 विरुद्ध BBV152 लसींचे मूल्यांकन केले. (हेही वाचा: Covid-19 Third Wave: देशात ऑगस्ट महिन्यात येणार कोरोनाची तिसरी लाट; ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्या शिगेला- Reports)
SARS-CoV-2 चा B.1.617.2 (डेल्टा) फॉर्म समोर आल्यानंतर तो वेगाने पसरू लागला व त्यामुळे भारतात दुसरी लाट आली. डेल्टा फॉर्मच्या विरूद्ध कोवॅक्सिनची प्रभावीता 65.2 टक्के आहे. त्यानंतर, पुढे डेल्टा AY.1, AY.2, आणि AY.3 मध्ये बदलला. अभ्यासात म्हटले आहे की, यापैकी AY.1 व्हेरिएंट पहिल्यांदा एप्रिल 2021 मध्ये भारतात सापडला आणि नंतर 20 इतर देशांमध्येही त्याच्या केसेस नोंदवण्यात आल्या. कोवॅक्सिनची कोविड-19 विरूद्ध प्रभावीता 77.8 टक्के आणि डेल्टा फॉर्मच्या B.1.617.2 विरुद्ध ती 65.2 टक्के होती.