कोरोना विषाणू (Coronavirus) मुळे देशात ज्या प्रकारे आरोग्याच्या समस्या उद्भवल्या आहेत, तसेच देशाचे आर्थिक गणितही पूर्णतः बिघडले आहे. अनेक दिवस उद्योग बंद असल्याने व्यापारांचे नुकसान तर झालेच आहे, मात्र अनेकांच्या नोकरीवरही गदा आली आहे. अशात रेटिंग एजन्सी क्रिसिल (CRISIL) नुसार, भारतीय अर्थव्यवस्था स्वातंत्र्यानंतरच्या चौथ्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. एजन्सीचे म्हणणे आहे की, स्वातंत्र्यानंतर तीन वेळा अर्थव्यवस्थेला मंदीचा (Recession) फटका बसला होता. परंतु कोरोना विषाणूमुळे झालेल्या लॉक डाऊनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला सर्वाधिक धक्का बसला आहे.
या रेटिंग एजन्सीच्या मते, भारत आतापर्यंतच्या सर्वात वाईट मंदीचा सामना करीत आहे.स्वातंत्र्यानंतरची ही चौथी मंदी, तर उदारीकरणानंतरची ही पहिली मंदी आहे जी सर्वात तीव्र आहे. रेटिंग एजन्सी म्हणते की, या साथीच्या रोगानंतरही भारतीय अर्थव्यवस्थेत सामान्य वाढ होण्यासाठी किमान 3 ते 4 वर्षे लागतील. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, लॉक डाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. एजन्सीने 2020-21 या आर्थिक वर्षाच्या जीडीपी विकास दरात 5 टक्के घट होण्याचा अंदाज वर्तविला आहे. यापूर्वी 28 एप्रिल रोजी क्रिसिलने जीडीपी विकास दर 3.5 टक्क्यांवरून 1.8 टक्के राहील असा अंदाज वर्विला होता. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, गेल्या एका महिन्यात आर्थिक परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) भारताचा जीडीपी 25 टक्क्यांनी खाली येण्याची शक्यता असल्याचे, क्रिसिलने सांगितले आहे. एजन्सीने कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित राज्यांच्या अर्थव्यवस्थेवर दीर्घकाळ परिणाम होण्याची भीती देखील व्यक्त केली आहे. क्रिसिलचा असा विश्वास आहे की गेल्या 69 वर्षातील आकडेवारी पाहिल्यास, देशात 1958, 1966 आणि 1980 या काळात फक्त तीन वेळा आर्थिक मंदी आली होती. या तिन्ही मंदीचे एकमेव कारण म्हणजे, खराब पावसामुळे शेतीवर प्रचंड परिणाम झाला आणि अर्थव्यवस्थेचा मोठा भाग बाधित झाला होता. क्रिसिलच्या मते, लॉक डाऊनमुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सर्वाधिक फटका बसणार आहे. पर्यटनासारख्या क्षेत्राची सर्वात वाईट परिस्थिती आहे.