राज्यसभेच्या (Rajya Sabha ) रिक्त 11 जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल सोमवारी (2 नोव्हेंबर) जाहीर झाला. राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Elections 2020) एकूण 11 पैकी 9 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. या निकालामुळे राज्यसभेतील भाजप (BJP) सदस्यांची संख्या 92 तर एनडीएतील (NDA) सदस्यांची संख्या 100 पेक्षाही अधिक झाली आहे. असे असले तरी एनडीए आणि पर्यायाने भाजप प्रणित मोदी सरकार राज्यसभेत अद्यापही बहुमतापासून बरेच दूर असल्याचे चित्र आहे. तर दुसऱ्या बाजूला गेली अनेक वर्षे केंद्रीय सत्तेत राहिलेल्या काँग्रेस पक्ष (Congress Party) पहिल्यांदाच राज्यसभेत अल्पसंख्येत पाहायला मिळाला. राज्यसभेत काँग्रेस पक्षाचे केवळ 40 सदस्य आहेत. बहुमताच्या आकड्याचा विचार करायचा तर एनडीएला अजूनही 31 सदस्यांची आवश्यकता आहे.
राज्यसभेत बहुमतासाठी आकडा 132 इतका आहे. भारतीय जनता पक्षाचे 92 आणि भाजपच्या मित्रपक्षांचे म्हणजेच एनडीएचे सदस्य मिळून हा आकडा 98 होतो. त्यात एआडएडीएमके पक्षाचे 9 सदस्य त्यात समाविष्ठ केले तरी हा आकडा 107 वर कसाबसा पोहोचतो. त्यामुळे राज्यसभेत मोदी सरकार अद्यापही बहुमतापासून दूरच असल्याचे पाहायला मिळते. कर्नाटकमध्ये अशोक गस्ती या राज्यसभा खासदाराचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. या जागेसाठी येत्या 1 डिसेंबरला पोटनिवडणूक घेतली जात आहे. या निवडणुकीत भाजप उमेदवार विजयी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे ही जागा मिळाली तरी राज्यसभेत भाजप 93 आणि एनडीए 108 वर पोहोचते. आगामी अधिवेशनापूर्वी राज्यसभेत भाजप आणि एनडीएचे बहुमत वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, 11 जागांसाठी झालेल्या राज्यसभा निवडणुकीतील निकालाबाबत सांगायचे तर उत्तर प्रदेशमधील 8 आणि उत्तराखंड येथील एका जागेवर भाजप उमेदवार विजयी झाले. उत्तर प्रदेशमध्ये बसपा आणि सपाला प्रत्येकी एक जागा मिळाली. (हेही वाचा, MLC Elections: विधानपरिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणुका जाहीर; भाजपपुढे 'या' जागा राखण्याचे मोठे आव्हान)
काँग्रेसचे राज्यसभा खासदार पीएल पुनिया आणि राज बब्बर यांचा कार्यकाळ येत्या 25 नोव्हेंबरला संमाप्त होत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या राज्यसभेतील जागा आणखी घट होऊन त्या 38 वर पोहोचणार आहेत.
दरम्यान उत्तर प्रदेशहून भाजपचे जे आठ खासदार राज्यसबेसाठी निवडल गेले आहेत. त्यात केन्द्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, नीरज शेखर, अरुण सिंह, गीता शाक्य, हरिद्वार दूबे, बृजलाल, बीएल वर्मा आणि सीमा द्विवेदी आणि उत्तराखंड येतून नरेश बंसल यांच्या नावाचा समावेश आहे. तर समाजवादी पक्षाकडून रामगोपाल यादव आणि बसपाकडून लाल गौतम यांचा समावेश आहे.