Poverty In India: कोरोना विषाणू महामारीने 7.5 कोटी भारतीयांना गरिबीमध्ये ढकलले; Pew Research Center च्या अहवालातून खुलासा
Poverty in India increased amid COVID-19 pandemic| Representational Image (Photo Credits: Pixabay)

सध्या सुरू असलेल्या कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीचा केवळ जागतिक अर्थव्यवस्थेवरच परिणाम झाला नाही, तर लोकांच्या उत्पन्नावरही मोठा परिणाम झाला आहे. या साथीच्या रोगात कोट्यवधी उद्योग नष्ट झाले आणि कोट्यावधी लोकांनी रोजगार गमावला. या साथीच्या आजाराचा नकारात्मक प्रभाव भारतातही दिसून आला आहे. या साथीने भारतातील मध्यमवर्गीय श्रेणीतील 32 दशलक्ष लोकांना अजून खाली आणले आहे. अमेरिकेच्या प्यू रिसर्च सेंटरने (Pew Research Center) प्रसिद्ध केलेल्या अहवालात हा धक्कादायक खुलासा झाला आहे. 1990 नंतर प्रथमच कोरोनामुळे जगभरातील मध्यमवर्गीय लोकांची संख्या कमी झाली आहे. विकसनशील देशांतील जवळजवळ दोन तृतियांश कुटुंबांनी त्यांना उत्पन्न कमी झाल्याचे कबूल केले आहे.

दिवसाला 10 ते 20 डॉलर्सपर्यंतची कमाई होत असलेल्या लोकांची गणती मध्यमवर्गीयात केली जाते. प्यू रिसर्च सेंटर या संशोधन गटाच्या अभ्यासानुसार, गेल्या वर्षी जगातील मध्यमवर्गाची संख्या 9 कोटींवरून सुमारे अडीच अब्जांवर गेली आहे. अभ्यासानुसार कोरोना साथीच्या आजारामुळे देशात उच्च उत्पन्न गटातील 6.2 कोटी लोक मध्यमवर्गीय प्रकारात आले आहेत. उच्च उत्पन्नाच्या श्रेणीत असे लोक येतात, ज्यांचे दैनिक उत्पन्न 50 डॉलर्स किंवा त्याहून अधिक म्हणजे सुमारे 3630.50 रुपये आहे. तसेच दररोज सुमारे दीडशे किंवा त्याहून कमी रुपये मिळवणाऱ्या गरीब लोकांची संख्या 75 दशलक्षांवर गेली आहे.

प्यू रिसर्च सेंटरने जागतिक बँकेच्या आर्थिक विकासाचा अंदाज व्यक्त करत म्हटले आहे की, कोरोना काळातील मंदीदरम्यान चीनपेक्षा भारतमध्ये जास्त मध्यमवर्गीय घट आणि दारिद्र्य जास्त असेल. गेल्या वर्षी जानेवारीत जागतिक बँकेने भारत आणि चीनचा आर्थिक विकास दर जवळजवळ समान असेल असे सांगितले होते. परंतु साथीच्या सुमारे एक वर्षानंतर, जागतिक बँकेने या जानेवारीत आपल्या अंदाज भारतासाठी 9.6 टक्के घट आणि चीनसाठी 2 टक्के वृद्धी वर्तवला आहे. (हेही वाचा: COVID19 ची लस घेतल्यानंतर प्रकृती बिघडल्याने रुग्णालात दाखल झाल्यास विमा कंपनी करणार खर्च: IRDAI)

या अहवालानुसार कोरोनामुळे लॉकडाऊन लादल्यामुळे भारतातील आर्थिक बाबी ठप्प झाल्या. अनेकांनी रोजगार गमावल्याने भारतामध्ये 40 वर्षांतील सर्वात मोठी आर्थिक मंदी आली. अहवालात म्हटले आहे की चीनने तुलनेने चांगले कामगिरी केली, मध्यमवर्गीय लोकांची संख्या अवघी 10 दशलक्षांनी घसरली, तर 2020 मध्ये गरीबीची पातळी जवळजवळ बदलली नाही.