Andhra Pradesh Police Seize Rs 7 Crore Cash: छोटा हत्ती उलटताच रस्त्यावर पैशांचा पाऊस; पोलीस येताच सापडले 7 कोटी रुपयांचे घबाड
Cash | File Image

Andhra Pradesh Cash Seized: लोकसभा निवडणूक 2024 च्या धामधुमीत आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) पोलिसांनी एकदोन नव्हे तर तब्बल 7 कोटी रुपयाची रोकड जप्त केली आहे. धक्कादायक म्हणजे स्थानिक नागरिकांनी पोलिसांना या पैशांबाबत माहिती दिली. हे पैसे नेमके कोणाचे आहेत, कोणत्या कारणासाठी इतकी मोठी वाहतूक केली जात आहे याबाबत अद्याप माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, दोन वाहनांच्या धडकेत छोटा हत्ती हे वाहन उलटे आणि त्यातून पैशांची बंडलं रस्त्यांवर पडली. त्यामुळे स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि याबाबत पोलिसांनाही माहिती दिली. नल्लाजरला मंडलातील अनंतपल्ली येथे एका लॉरीच्या धडकेनंतर गाडी पलटी झाल्यानंतर त्यातील सात बॉक्समध्ये भरलेली रोकड सापडली.

आचारसंहितेचा भंग?

लोकसभा निवडणूक सुरु असल्याने देशभरात आदर्श आचारसंहीता लागू आहे. या काळात पाच लाखांपेक्षा अधिक रोख रक्कम सोबत बाळगणे हा आचारसंहितेचा भंग मानला जाणार आहे. त्यामुळे लाखांमध्ये काय.. इथे तर चक्क पोत्याने कोट्यवधी रुपयांची वाहतूक होत आहे. ही वाहतूक कोणासाठी केली जात आहे याबाबत पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी सर्व रक्कम ताब्यात घेतली असून तपास सुरु केला आहे. (हेही वाचा, ED Uncovers Huge Cash In Ranchi: रांची येथे घबाड, तब्बल 30 कोटी रुपयांची रोखड, 6 यंत्रांद्वारे सलग 12 तास उलटले तरी ईडीकडून मोजणी सुरुच (Watch Video))

पैशांचे बंडल रस्त्यांवरही पडले

प्राप्त माहितीनुसार, आंध्र प्रदेश राज्यात पूर्व गोदावरी येथे छोटा हत्ती आणि टिप्पर या वाहनाची धडक झाली. यात एक वाहन पलटी झाले. धडकेचा आवाज होताच स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, रहिवाशांच्या लक्षात आले की वाहनातील अनेक गोण्यांमध्ये रोख रक्कम आहे. पैशांचे बंडल रस्त्यांवरही पडले आहेत. दरम्यान, रोख रक्कम हस्तांतरित केली गेली आणि त्यांनी तातडीने पोलिसांना सूचना दिली. तपासात असे समोर आले की, घटनेच्या वेळी हे वाहन विजयवाडाहून विशाखापट्टणमला जात होते. पलटी झालेल्या वाहनाचा चालक जखमी झाला असून त्याला तातडीने गोपालपुरम रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या रोकडचे मूळ शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी कसून चौकशी सुरू केली आहे.

राज्याच्या एनटीआर जिल्ह्यातील एका चेकपोस्टवर ट्रकमधून 8 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केल्याच्या आणखी एका घटनेनंतर दोनच दिवसांनी ही घटना घडली आहे. पाईपने भरलेल्या ट्रकच्या गुप्त डब्यात लपवून ठेवलेल्या पैशांसह या रोख जप्तीप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. 13 मे रोजी होणाऱ्या आगामी निवडणुकांसह, राज्यातील ही दुसरी महत्त्वाची रोकड जप्तीची घटना आहे.