PM Narendra Modi US Visit: डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) यांच्या शपथविधी सोहळ्यापासूनच अमेरिकेचे अध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यातील भेटीबद्दल चर्चा होती. आता सूत्रांचे म्हणणे आहे की येत्या 13 फेब्रुवारीला ट्रम्प आणि मोदी यांची भेट होऊ शकते. वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान 13 फेब्रुवारी रोजी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील. दोन्ही देशांमधील व्यापार, संरक्षण आणि तंत्रज्ञान सहकार्यावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान ही बैठक होण्याची अपेक्षा आहे. नरेंद्र मोदी 12 फेब्रुवारी रोजी दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
ट्रम्प दुसऱ्यांदा व्हाईट हाऊसमध्ये आल्यानंतर अमेरिका आणि जगातील काही निवडक देशांमध्ये सुरू झालेले व्यापार युध्द आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम यांच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा होत आहे. पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झालेला नाही, परंतु असे म्हटले जात आहे त्यांचा दोन दिवसांचा फ्रान्स दौरा संपल्यानंतर मोदी थेट अमेरिकेला जातील.
पीएम मोदी 10 फेब्रुवारी रोजी एआय अॅक्शन समिटमध्ये सहभागी होण्यासाठी पॅरिसला जाणार आहेत. फ्रान्सहून निघून ते 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी अमेरिकेत पोहोचतील. दुसऱ्या दिवशी, १३ फेब्रुवारी रोजी, ते राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भेटतील आणि त्यांच्याशी चर्चा करतील. ट्रम्प मोदींच्या सन्मानार्थ रात्रीच्या जेवणाचे आयोजन करतील असे मानले जात आहे. दोन्ही नेते इंडो-पॅसिफिक प्रदेशातील व्यापार, शुल्क, संरक्षण सहकार्य आणि प्रादेशिक सुरक्षेवर चर्चा करण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना अशा प्रकारे भेटणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले दक्षिण आशियाई नेते असतील. (हेही वाचा: US-Canada Trade Trade War: कॅनडाने अमेरिकन वस्तूंवर लादला 25% कर; डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापर धोरणास जस्टिन ट्रूडो यांचा धक्का)
अमेरिकेच्या नवीन राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीच्या एका आठवड्यानंतर, 27 जानेवारी रोजी, पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा झाली. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले. फोनवरील संभाषणानंतर, व्हाईट हाऊसने म्हटले होते की, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत बनवलेल्या सुरक्षा उपकरणांची भारताची खरेदी वाढवण्याचे आणि निष्पक्ष द्विपक्षीय व्यापार संबंधांकडे वाटचाल करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.