PM Narendra Modi | (Photo Credits: YouTube)

कोरोना विषाणू (Coronavirus) काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची लोकप्रियता कमी झाल्याबद्दल अनेक दावे करण्यात आले होते, परंतु अमेरिकन डेटा इंटेलिजेंस फर्म मॉर्निंग कन्सल्टने (Morning Consult) केलेल्या सर्वेक्षणानुसार स्पष्ट झाले आहे की, जगातील सर्वाधिक पसंतीच्या नेत्यांमध्ये पीएम मोदी हे अजूनही पहिल्या क्रमांकावर आहेत. या अहवालानुसार, पंतप्रधान मोदींची लोकप्रियता अजूनही अबाधित आहे. या यादीमध्ये ते जगातील अनेक बड्या देशांच्या नेत्यांपेक्षाही पुढे आहेत. अमेरिकेच्या डेटा इंटेलिजेंस फर्मने केलेल्या सर्वेक्षणानुसार पंतप्रधान मोदी यांचे जागतिक पातळीवरील मान्यता रेटिंग (Approval Rating) 66 टक्के आहे, जे इतर जागतिक नेत्यांपेक्षा कितीतरी जास्त आहे.

मॉर्निंग कन्सल्टच्या डेटावरून असे दिसून आले आहे की, कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेदरम्यान लोकप्रियतेच्या रेटिंगमध्ये घट झाल्यानंतरही पंतप्रधान मोदी अमेरिका, ब्रिटन, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनी या 13 देशांतील इतर जागतिक नेत्यांपेक्षा पुढे आहेत. या सर्वेक्षणानुसार, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान त्यांचे स्वीकृती रेटिंग कमी झाले आहे, परंतु त्यानंतरही ते जगात अव्वल स्थानी आहेत. केवळ तीन जागतिक नेत्यांची 60 च्या वर मान्यता रेटिंग आहे, ज्यामध्ये पीएम मोदी अव्वल आहेत. (हेही वाचा: कोविड-19 फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसाठी विशेष अभ्यासक्रम कार्यक्रमाचा PM Narendra Modi यांच्याहस्ते शुभारंभ; 26 राज्यात 111 केंद्रांवर 6 विशेष अभ्यासक्रम सुरु)

मॉर्निंग कन्सल्टिंग पॉलिटिकल इंटेलिजन्सच्या आकडेवारीनुसार पंतप्रधान मोदींचे सध्याचे रेटिंग 66 टक्के आहे, तर पंतप्रधान मोदींच्या पाठोपाठ इटलीचे पीएम मारिओ ड्रॅगीचे अप्रुव्हल रेटिंग 65 टक्के आणि मेक्सिकोचे अध्यक्ष लोपेझ ओब्राडोर यांचे 63 टक्के आहे. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (54%), जर्मन चांसलर अँजेला मर्केल (53%), अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन (53%), कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो (48%), ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन (44%) यांचे स्थान आहे.

पंतप्रधान मोदींच्या अप्रुव्हल रेटिंगमधील सुधारण्याचे श्रेय 7 जून रोजी त्यांच्या भाषणात दिले जाऊ शकते, ज्यात त्यांनी बर्‍याच मोठ्या घोषणा केल्या होत्या. मॉर्निंग कन्सल्टच्या म्हणण्यानुसार, ऑगस्ट 2019 मध्ये जेव्हा मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले तेव्हा, त्यांचे मान्यता रेटिंग 82 टक्के होते.