पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप (BJP) प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Union Cabinet Expansion) आज (7 जुलै) सायंकाळी सहा वाजता पार पडतो आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीतील पंतप्रधान निवास आणि कार्यालयातील लगबग वाढली आहे. प्राप्त माहितीनुसार, या मंत्रिमंडळ विस्तारात नवे जुणे असे जवळपास 43 मंत्री शपथ घेणार असल्याची चर्चा आहे. या मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान विद्यमान मंत्र्यांपैकी काहींचा खांदेपालट तर काहींना डच्चू देण्यात येणार असल्याचे समजते. विस्तारादरम्यान व्या 14 मंत्र्यांचा समावेश होऊ शकतो. तसेच कमीत कमी तीन राज्यमंत्र्यांना बढती दिली जाऊ शकते.
राज्यमंत्र्यांना मिळू शकते बढती
केंद्रीय मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार याबाबत उत्सुकता असली तरी अद्याप कोणाचेच नाव जाहीर झाले नाही. मात्र जवळपास 17 नावे मंत्रिपदासाठी निश्चित मानली जात आहेत. यात ज्योतिरादित्य सिंधिया, सर्बानंद सोनोवाल, नारायण राणे, वरुण गांधी, मीनाक्षी लेखी यांच्या नावाचा समावेश आहे. हे 17 जण आज (बुधवार, 7 जुलै) सकाळीच पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचली आहेत. दुसऱ्या बाजूला केंद्रात सध्या राज्यमंत्री म्हणून कार्यरत असलेल्या अनुराग ठाकुर, पुरुषोत्तम रूपाला, जी.के. रेड्डी आदी मंडळींना कॅबिनेट पदावर बढती मिळू शकते. दरम्यान, डॉ. हर्षवर्धन, संतोष गंगावार आण थावरचंद गहलोत यांच्यासह 4 कॅबिनेट मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. (हेही वाचा, PM Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार, मोदी कॅबिनटमध्ये तरुणांसोबतच Ph.D, MBA, पोस्ट ग्रेजुएट चेहऱ्यांच्या समावेशाची शक्यता)
एनडीए घटक पक्षांना संधी मिळण्याची शक्यता
दरम्यान, अशीही चर्चा आहे की, एनडीएचे घटक पक्ष असलेल्या काही पक्षांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. यात पशुपति कुमार पारस (लोक जनशक्ति पार्टी) , आर.सी.पी. सिंह (जनता दल यूनायटेड), अनुप्रिया पटेल (अपना दल) आदी मंडळींचा समावेश आहे.
सरकारमधील सूत्रांनी प्रसारमाध्यमांकडे दावा केला आहे की, भारताच्या इतिहासातील हे सर्वात तरुण मंत्रिमंडळ असेल. तसेच, मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलात ओबीसी (OBC) समाजाला विस्तृत स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय प्रशासकिय कामाचा अनुभव असलेल्या मंडळींनाही खास प्रतिनिधित्व दिले जाईल.