
गेल्या काही वर्षांमध्ये भारतात अनेक स्टार्टअप्स (Indian Startups) उभे राहिले आहेत. सर्वत्र नवीन कल्पना, नवीन व्यवसाय मॉडेल आणि नवोपक्रमाची चर्चा आहे. अशात, असा प्रश्न देखील उपस्थित होतो की आपण खरोखरच नवोन्मेष करत आहोत की फक्त गिग इकॉनॉमीचा भाग बनत आहोत? गुरुवारी, 3 एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी याबाबत महत्वाचे भाष्य केले. राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथे तीन दिवसांच्या 'स्टार्टअप महाकुंभ 2025’ च्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन करताना गोयल यांनी भारताच्या स्टार्टअप मॉडेलवर निशाणा साधला. त्यांनी भारतातील स्टार्टअप्स उद्यागाची तुलना चीनशी करत, चीन टेक इनोव्हेशनमध्ये आघाडीवर असताना गिग जॉब्सवर भारताच्या अवलंबित्वाबद्दल चिंता व्यक्त केली. गोयल यांनी प्रश्न उपस्थित केला की, मोठ्या तांत्रिक प्रगतीसाठी प्रयत्न करण्याऐवजी देश कमी पगाराच्या फूड डिलिव्हरी नोकऱ्यांवर समाधानी आहे का?
गोयल यांनी स्टार्टअप्सना फक्त अन्न वितरण अॅप्स, आईस्क्रीम बनवणे यावर मर्यादित न राहता, एआय, रोबोटिक्स, आणि डीप टेकसारख्या उच्च-तंत्रज्ञान क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. गोयल म्हणाले, ‘आपण डिलिव्हरी बॉय आणि मुली बनण्याची आकांक्षा बाळगावी का? वाणिज्य मंत्र्यांनी असे नमूद केले की, भारतीय स्टार्टअप्स तंत्रज्ञानाच्या नवोपक्रमात आघाडी घेण्याऐवजी अन्न वितरण आणि गिग वर्क्सवर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. ते म्हणाले, आज आम्ही अन्न वितरण अॅप्सवर लक्ष केंद्रित करत आहोत, बेरोजगार तरुणांना स्वस्त कामगार बनवत आहोत, जेणेकरून श्रीमंत लोक त्यांचे घर न सोडता त्यांचे अन्न मिळवू शकतील. (हेही वाचा: Innovative Pesticide Sprayer: महाराष्ट्रातील निओ फार्मटेकने तयार केले नाविन्यपूर्ण कीटकनाशक फवारणी यंत्र; Bill Gates यांनी आजमावला हात)
जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम म्हणून भारताच्या स्थानाची कबुली देताना गोयल म्हणाले, भारताने जे काही केले आहे त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे, पण तरीही आपण जगात नंबर 1 वर आहोत का? अजून नाही. त्यांच्या मते, भारतातील डीप-टेक स्टार्टअप्सची मर्यादित संख्या ही एक मोठी चिंता आहे. भारताच्या डीप-टेक क्षेत्रात फक्त 1,0000 स्टार्टअप्स असणे ही चिंताजनक परिस्थिती आहे, असे ते म्हणाले. पियुष गोयल यांनी तरुणांना ई-कॉमर्स आणि सेवा आधारित व्यवसायाव्यतिरिक्त नाविन्यपूर्णतेवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.
त्यांच्या मते, स्टार्टअप्सने फक्त सोयी सुविधांवर अवलंबून न राहता नवोन्मेषातून संपत्ती निर्माण करायला हवी. त्यांनी स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आणि 2047 पर्यंत भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी तयार राहण्यास सांगितले. स्टार्टअप महाकुंभात त्यांनी फूड डिलिव्हरी आणि इन्स्टंट ग्रॉसरी डिलिव्हरीवर अवलंबून असलेल्या स्टार्टअप्सना उद्देशून म्हटले की, ही उद्योजकता आहे, पण खरा स्टार्टअप नाही. त्यांनी तरुणांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची ओळख निर्माण करण्याचे आव्हान दिले. या संदर्भात, गोयल यांनी देशांतर्गत गुंतवणुकीवरही भर दिला. ते म्हणाले की, भारतीय स्टार्टअप्स विदेशी गुंतवणूकदारांना स्वस्तात विकले जाणे दुःखद आहे, आणि यासाठी आपल्याला स्वदेशी भांडवल वाढवायला हवे.