Indian Army

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, आणि हा 2008 च्या मुंबई हल्ल्यांनंतरचा सर्वात घातक नागरी हल्ला मानला जातो. हा हल्ला ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) या पाकिस्तानस्थित ‘लष्कर-ए-तय्यबा’ (LET) च्या उपशाखेने केल्याचा दावा केला आहे. या घटनेनंतर भारत सरकार फेब्रुवारी 2021 मध्ये पाकिस्तानसोबत झालेला नियंत्रण रेषेवरील (LOC) युद्धबंदी करार (Ceasefire Agreement) रद्द करण्याच्या विचारात आहे. पाकिस्तानने दहशतवाद नियंत्रणात ठेवण्याचे आश्वासन पाळले नसल्याचा आरोप होत आहे.

हल्ल्याची पार्श्वभूमी:

पहलगाममधील बैसारण खोरे, ज्याला ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणूनही ओळखले जाते, हे पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठिकाण आहे. 22 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2.50 वाजता, दहशतवाद्यांनी या खोऱ्यात प्रवेश केला आणि पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, यापैकी बहुतांश हिंदू पर्यटक होते, आणि 20 हून अधिक जण जखमी झाले. हल्लेखोरांनी एम4 कार्बाइन आणि एके-47 रायफल्सचा वापर केला आणि ते लष्करी गणवेशात होते.

हल्ल्यानंतर भारतीय लष्कर, अर्धसैनिक दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त शोधमोहीम सुरू केली. पहलगाममध्ये तात्पुरता लॉकडाऊन लागू करण्यात आला, आणि दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टर्सचा वापर करण्यात आला. गुप्तचर माहितीनुसार, पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ 42 दहशतवादी तळ सक्रिय असून, 110-130 दहशतवादी तिथे उपस्थित आहेत. यापैकी 115 पाकिस्तानी दहशतवादी आहेत.

युद्धबंदी करार आणि त्याचे उल्लंघन:

फेब्रुवारी 2021 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांनी नियंत्रण रेषेवर युद्धबंदी करार जाहीर केला, ज्याचा उद्देश दोन्ही देशांमधील सीमेवरील शांतता आणि स्थिरता राखणे हा होता. हा करार दोन्ही देशांमधील 75 वर्षांच्या इतिहासातील सर्वात दीर्घकाळ टिकलेला युद्धबंदी करार मानला जातो. मात्र या कराराला दहशतवादी हल्ले, राजकीय नेतृत्वातील बदल आणि प्रादेशिक तणाव यांच्यामुळे धोका निर्माण झाला आहे. आता भारताने हा भारताने हा करार रद्द करण्याचा विचार सुरू केला.

पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना, जसे की लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-मोहम्मद आणि टीआरएफ, यांनी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी आणि हल्ले सुरू ठेवले आहेत. पहलगाम हल्ल्यापूर्वी, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी काश्मीरमधील ‘भारतीय कब्जा’ विरोधात लढण्याचे समर्थन करणारे वक्तव्य केले होते, ज्याला भारताने दहशतवादाला प्रोत्साहन देणारे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने युद्धबंदी करार रद्द करू शकतो. (हेही वाचा: Pahalgam Terror Attack: आता पाकिस्तानची खैर नाही! मोदी आणि नेतन्याहू यांच्यात गुप्त चर्चा)

भारताची राजनैतिक आणि कायदेशीर कारवाई:

पहलगाम हल्ल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 23 एप्रिल 2025 रोजी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (सीसीएस) ची बैठक झाली, ज्यामध्ये पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे-

इंडस वॉटर ट्रीटी स्थगित करण्यात आला आहे. जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झालेला हा करार, ज्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सहा नद्यांचे पाणीवाटप होते, तो अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला.

भारत-पाकिस्तानमधील व्यापार आणि लोकांच्या संपर्कासाठी महत्त्वाची असलेली अटारी सीमा तात्काळ बंद करण्यात आली.

सार्क व्हिसा छूट योजनेसह सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश नाकारण्यात आला. यापूर्वी जारी केलेले व्हिसा रद्द करण्यात आले.

नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागारांना एका आठवड्यात देश सोडण्यास सांगण्यात आले.