Hurun India Philanthropy List 2024 (Photo Credits: Wikimedia Commons)

एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे (HCL Technologies Limited) संस्थापक शिव नाडर (Shiv Nadar) हे पुन्हा एकदा भारतातील परोपकारी लोकांच्या (Generous Philanthropist) यादीत अव्वल स्थानावर आहेत. शिव नाडर यांनी एडेलगिव्ह-हुरुन इंडिया फिलान्थ्रॉपी लिस्ट 2024 च्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. पाच वर्षांत त्यांनी तिसऱ्यांदा भारतातील परोपकारी व्यक्तींच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. या यादीनुसार, शिव नाडर यांनी दरवर्षी 2,153 कोटी रुपये दान केले आहेत, म्हणजेच दररोज 5.9 कोटी रुपये दान केले. हे गेल्या वर्षीच्या तुलनेत 5% अधिक आहे. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून 407 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

ऑटोमोटिव्ह आणि फायनान्स क्षेत्रात स्वारस्य असलेल्या बजाज कुटुंबाने धर्मादाय कारणांसाठी 352 कोटी रुपये दान केले, जे वार्षिक 33 टक्क्यांनी वाढले आहे. या यादीत ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. कुमारमंगलम बिर्ला आणि त्यांचे कुटुंब एकूण 334 कोटी रुपयांच्या देणगीसह चौथ्या स्थानावर आहे. वार्षिक आधारावर ही 17 टक्के वाढ आहे. इन्फोसिसचे नंदन नीलेकणी (69) हे उद्योगपती 307 कोटी रुपयांच्या देणगीसह यादीत सहाव्या स्थानावर आहेत. अब्जाधीश गौतम अदानी यांनी 330 कोटी रुपयांचे धर्मादाय योगदान दिले आहे, जे यादीत 5 व्या क्रमांकावर आहेत.

इंडो एमआयएमचे अध्यक्ष कृष्णा चिवुकुला, यांचा पहिल्यांदाच या यादीत समावेश करण्यात आला आहे. ते सातव्या स्थानावर आहेत. आठव्या क्रमांकावर अनिल अग्रवाल आणि त्यांचे कुटुंब आहे, ज्यांनी 181 कोटी रुपये दान केले आहेत. 9व्या क्रमांकावर सुस्मिता आणि सुब्रतो बागची आहेत. दहाव्या स्थानावर रोहिणी नीलेकणी असून, त्यांनी 154 कोटींची देणगी दिली आहे. हुरुनच्या श्रीमंतांच्या यादीनुसार, एकूण 203 व्यक्तींनी धर्मादाय कारणांसाठी 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला. यादीत समाविष्ट असलेल्या देणगीदारांनी शिक्षण क्षेत्रात सर्वाधिक देणगी दिली आहे. 123 देणगीदारांनी या क्षेत्रासाठी सुमारे 3,680 कोटी रुपयांची देणगी दिली, त्यापैकी 1,936 कोटी रुपये शिव नाडर आणि कुटुंबाने दान केले आहेत. (हेही वाचा: 1992-2023 दरम्यान आयसीटीचा विकास दर पोहोचला 13 . 2 टक्क्यांवर - RBI Report)

दरम्यान, 1976 मध्ये शिव नाडर यांनी सुमारे 2 लाख रुपयांच्या गुंतवणुकीने एचसीएलची पायाभरणी केली. 1991 मध्ये, समूहाने सॉफ्टवेअर व्यवसायात प्रवेश केला आणि एचसीएल टेकची स्थापना झाली. इथून पुढची कथा आता एक गौरवशाली इतिहास आहे. एचसीएल टेक ही आज देशातील एक प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी आहे, जी लाखो लोकांना रोजगार देते.