
Tourists From Pune Stranded In Jammu and Kashmir: पुण्यातील 500 हून अधिक पर्यटक सध्या जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir) मध्ये अडकले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) या पर्यटकांना परतण्यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाने बुधवारी संध्याकाळी ही माहिती दिली. पुण्यात एका ऊर्जा कंपनीत काम करणारे गिरीश नायकवाडी यांनी सांगितले की, ते 14 जणांच्या गटासह जम्मू आणि काश्मीरला गेले होते. परंतु, आता दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी आपला प्रवास थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. 'आम्ही आमचा प्रवास सुरू ठेवण्याच्या स्थितीत नाही. आम्हाला शक्य तितक्या लवकर पुण्याला परतायचे आहे. कारण आमच्यासोबत लहान मुले आहेत, असं गिरीश नायकवाडी यांनी म्हटलं आहे.
हल्ल्यानंतर अमृतसरचा प्रवासही रद्द -
दरम्यान, गिरीश नायकवाडी यांनी सांगितले की, 'जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्यांचा गट श्रीनगरपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुलमर्गमध्ये होता. आज आम्ही कसेतरी श्रीनगरला पोहोचलो. सुरुवातीच्या योजनेनुसार, आम्हाला 25 एप्रिल रोजी अमृतसरला जायचे होते पण या घटनेनंतर, ग्रूपमधील कोणालाही सहलीला जावेसे वाटत नाही.' (हेही वाचा - Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय खेळाडूंचा राग अनावर; चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा)
तथापि, दुसरे पर्यटक हर्षल पंडित यांनी सांगितले की, 'ते आणि त्याचे कुटुंब गुरुवारी पुण्यात परततील. आम्ही सध्या श्रीनगरमध्ये आहोत आणि परिस्थिती तणावपूर्ण आहे. सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. आज पहलगामला जाण्याचा आमचा प्लॅन होता, पण घटनेनंतर आम्हाला तो रद्द करावा लागला.' (वाचा - Pahalgam Terror Attack चा मास्टरमाईंड Saifullah Khalid कोण?)
'सरहद' अडकलेल्या पर्यटकांना मदत करणार -
दरम्यान, काश्मिरी तरुणांच्या पुनर्वसनासाठी काम करणारी पुणेस्थित स्वयंसेवी संस्था सरहद अडकलेल्या पर्यटकांना मदत करण्यासाठी आपले संसाधने वापरत आहे. काश्मीरमधील आमचे स्वयंसेवक अडकलेल्या पर्यटकांना राहण्याची व्यवस्था आणि रसद पुरवण्यात मदत करत आहेत, असे सरहदचे संस्थापक संजय नहार यांनी सांगितले.