Mayonnaise (प्रातिनिधिक प्रतिमा)

राज्यातील अन्न सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त करत, तामिळनाडू (Tamil Nadu) सरकारने कच्च्या अंड्यांचा (Mayonnaise Made From Raw Eggs) वापर करून तयार केलेल्या मेयोनेझचे उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर तात्काळ प्रभावाने एक वर्षासाठी बंदी घातली आहे. ही बंदी 8 एप्रिलपासून लागू झाली आहे. गेल्या काही महिन्यांत कच्च्या अंड्यापासून बनवलेल्या मेयोनेझच्या सेवनामुळे लोकांमध्ये अन्नातून विषबाधेची लक्षणे दिसून आल्याच्या घटना समोर आल्यानंतर सरकारचा हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, अन्न सुरक्षा कायदा, २००६ च्या कलम 30(2)(अ) अंतर्गत सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी ही बंदी घालण्यात आली आहे. पोषण तज्ञांचा असाही विश्वास आहे की कच्च्या अंड्यापासून बनवलेल्या उत्पादनांमध्ये हानिकारक जीवाणू वाढण्याचा धोका असतो, ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. खाद्य सुरक्षा आयुक्त आणि प्रधान सचिव आर. लालवेना यांनी याबाबत राजपत्रात अधिसूचना जारी केली आहे.

मेयोनेझ हे कच्च्या अंड्याचा पिवळा भाग, वनस्पती तेल, व्हिनेगर आणि इतर मसाले वापरून बनवले जाते. हे शावरमा, सँडविच, बर्गर आणि सॅलड यांसारख्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते. तामिळनाडूमधील रेस्टॉरंट्स, रस्त्यावरील खाद्य स्टॉल्स आणि केटरिंग सेवांमध्ये मेयोनेझ बनवण्याच्या आणि साठवण्याच्या अस्वच्छ पद्धतींमुळे खाद्य सुरक्षा विभागाच्या नियमित तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्या. या त्रुटींमुळे मेयोनेझमध्ये सॅल्मोनेला टायफीम्यूरियम, सॅल्मोनेला एंटेरिटिडिस, एश्चेरिचिया कोलाई (E. coli) आणि लिस्टेरिया मोनोसायटोजेन्स यांसारख्या जीवाणूंच्या संदूषणाचा धोका वाढला आहे.

हे जीवाणू गंभीर अन्न विषबाधा, आतड्यांचे संक्रमण आणि इतर आरोग्य समस्या  निर्माण करू शकतात, विशेषतः लहान मुले, गर्भवती महिला आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींसाठी, या गंभीर बाबी आहेत. खाद्य सुरक्षा विभागाला असे आढळले की, अनेक खाद्य व्यवसाय संचालक मेयोनेझ बनवताना कच्च्या अंड्यांचा वापर करतात आणि त्याची योग्य तापमानात साठवणूक किंवा स्वच्छतेची काळजी घेत नाहीत. यामुळे जीवाणूंची वाढ जलद होते, ज्यामुळे खाद्य विषबाधेच्या घटना वाढल्या आहेत.

यापूर्वी तेलंगाना (ऑक्टोबर 2024) आणि केरळ (जानेवारी 2023) यांनीही असाच प्रतिबंध लागू केला होता, कारण तिथे शावरमा आणि इतर पदार्थांमुळे अन्न विषबाधेच्या अनेक घटना घडल्या होत्या. तामिळनाडूतही अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार, सर्व खाद्य व्यवसाय संचालकांना- रेस्टॉरंट्स, केटरर्स, किरकोळ विक्रेते किंवा खाद्य स्टॉल्स असोत, कच्च्या अंड्यांपासून बनवलेल्या मेयोनेझच्या उत्पादन, प्रक्रिया, पॅकेजिंग, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी आहे. (हेही वाचा: Lay's Potato Chip: लेज बटाट्याच्या चिप्स खाल्ल्याने मृत्यू होऊ शकतो का? Frito-Lay कंपनीने उत्पादनांची बॅच परत मागवली; काय आहे नेमक प्रकरण? वाचा)

ही बंदी 8 एप्रिल 2025 पासून लागू झाली असून, ती एक वर्षासाठी, म्हणजेच 7 एप्रिल 2026 पर्यंत प्रभावी राहील. खाद्य सुरक्षा आणि मानक कायद्याच्या तरतुदीनुसार, उल्लंघन करणाऱ्यांना दंड, परवाना रद्द करणे आणि कायदेशीर कारवाई यांसारख्या कठोर शिक्षा होऊ शकतात. खाद्य सुरक्षा विभागाने राज्यभरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स  आणि खाद्य स्टॉल्सवर कडक तपासणी मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, ग्राहकांना मेयोनेझ असलेले पदार्थ खरेदी करताना त्यातील घटक तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सरकारने खाद्य व्यवसायांना पाश्चराइज्ड अंड्यांपासून बनवलेले किंवा अंडा-रहित मेयोनेझ वापरण्यास प्रोत्साहन दिले आहे, ज्यामुळे जीवाणूंच्या संदूषणाचा धोका कमी होतो.