Indian Auto Industry (Representative Image: ANI)

भारताच्या प्रवासी वाहन (Passenger Vehicle - PV) क्षेत्राने आर्थिक वर्ष FY 2024-25 मध्ये विक्रमी यश संपादन केले असून, एकूण 4.3 मिलियन युनिट्स विक्रीचा उच्चांक गाठला आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) द्वारे जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ही विक्री FY 2023-24 च्या तुलनेत 2% जास्त आहे, ज्यामुळे या क्षेत्रातील सुधारणा आणि ग्राहकांची वाढती मागणी अधोरेखित होते. युटिलिटी वाहन (UV) क्षेत्र हे यामध्ये मुख्य घटक ठरले असून, एकूण प्रवासी वाहन विक्रीपैकी 65% वाटा UV सेगमेंटचा आहे, जो मागील वर्षीच्या 60% च्या तुलनेत अधिक आहे. SIAM ने युटिलिटी वाहनांच्या आधुनिक डिझाइन, प्रगत वैशिष्ट्ये आणि सुधारित परफॉर्मन्सला या वाढीचे कारण म्हटले आहे. 'प्रवासी वाहनांची विक्री FY 2024-25 मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक असून, FY 2023-24 च्या तुलनेत 2% वाढ नोंदवली गेली आहे,' असे SIAM च्या निवेदनात म्हटले आहे.

वाहन निर्यातीत विक्रमी वाढ; नवीन मॉडेल्सनी दिली गती

  • FY 2024-25 मध्ये भारतातून एकूण 0.77 मिलियन युनिट्स प्रवासी वाहने निर्यात करण्यात आली, जी मागील वर्षाच्या तुलनेत 14.6% जास्त आहे. भारतीय बनावटीच्या जागतिक मॉडेल्ससाठी लॅटिन अमेरिका आणि आफ्रिका यांसारख्या बाजारपेठांमधील मजबूत मागणीमुळे ही वाढ झाली. याशिवाय, काही भारतीय वाहन उत्पादकांनी विकसनशील देशांव्यतिरिक्त विकसित बाजारातही प्रवेश केल्याने निर्यातीला आणखी गती मिळाली. (हेही वाचा, Maharashtra Govt To Legalise Bike Pooling: राज्यात बाईक पूलिंग आणि ई-बाईक टॅक्सी कायदेशीर होणार; वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय)
  • संपूर्ण भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाने देशांतर्गत विक्रीत 7.3% वाढ नोंदवली, तर निर्यातीमध्ये 19.2% वाढ झाली. SIAM च्या मते, ही वाढ मजबूत ग्राहक मागणी, सरकारच्या अनुकूल धोरणां, पायाभूत सुविधांमध्ये झालेली गुंतवणूक आणि शाश्वत वाहतूक साधनांवरील भर यामुळे शक्य झाली आहे.

टू-व्हीलर आणि EV विक्रीत लक्षणीय कामगिरी

  • टू-व्हीलर सेगमेंटमध्ये भारताने 19.6 मिलियन युनिट्स विक्रीची नोंद केली, जी FY 2023-24 च्या तुलनेत 9.1% जास्त आहे. यामध्ये स्कूटर सेगमेंट आघाडीवर राहिला, ग्रामीण भागात सुधारलेली कनेक्टिव्हिटी आणि वैशिष्ट्यपूर्ण मॉडेल्सच्या लाँचमुळे ही वाढ झाली. ग्रामीण मागणी आणि ग्राहकांचा आत्मविश्वास वाढल्यानेही विक्रीला चालना मिळाली.
  • इलेक्ट्रिक वाहनं (EVs) देखील लोकप्रिय ठरत असून, दोन चाकी वाहन विक्रीतील EVs चा हिस्सा 6% पेक्षा अधिक झाला आहे. याचवेळी, दोन चाकी वाहनांची निर्यातही 21.4% ने वाढून 4.2 मिलियन युनिट्स झाली आहे. यामागे उत्पादन नवकल्पना आणि आफ्रिका व लॅटिन अमेरिका बाजारातील वाढती मागणी कारणीभूत आहे.

FY 2025-26 साठी सकारात्मक दृष्टीकोन

SIAM ने FY 2025-26 साठी देखील भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राबाबत आशावादी दृष्टिकोन व्यक्त केला आहे. स्थिर आर्थिक परिस्थिती, सरकारच्या पुढाकाराचे धोरण, पायाभूत सुविधा विकास आणि सामान्य मान्सूनची शक्यता यामुळे ग्रामीण आणि निमशहरी भागात वाहनांची मागणी आणखी वाढेल, असा अंदाज आहे. भारताचा ऑटो उद्योग शाश्वत वाहतूक, तंत्रज्ञान प्रगती आणि निर्यात विस्तार यांच्या जोरावर आगामी काळात अधिक मजबूत होईल, असा विश्वास SIAM ने व्यक्त केला आहे.