Ferrari Burns 1 Hour After Delivery

एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी, तुम्ही 1-2 महिने नाही तर तब्बल 10 वर्षे बचत करता. यानंतर, तुम्ही ती वस्तू खरेदी केल्यानंतर जर जळून खाक झाली तर तुम्हाला कसे वाटेल? जपानमधील (Japan) एका व्यक्तीसोबत असे घडले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आपल्या आयुष्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी, या व्यक्तीने सुमारे 10 वर्षे दिवसरात्र मेहनत घेतली आणि प्रत्येक रुपयाची बचत करून एक नवीन फेरारी कार (Ferrari 458) खरेदी केली. मात्र या कारची डिलिव्हरी झाल्यानंतर अवघ्या तासाभरात ती जाळून खाक झाली. ही गाडी व्यक्तीच्या घरी पोहोचल्यानंतर साधारण तासाभरातच तिच्या इंजिनला अचानक आग लागली आणि ही गाडी जळाली.

द सनच्या अहवालात म्हटले आहे की संगीत निर्माता होनकॉन यांनी सुमारे 10 वर्षे बचत केली आणि 43 दशलक्ष जपानी येन म्हणजेच सुमारे 2.5 कोटी रुपये किमतीची फेरारी 458 स्पायडर कार खरेदी केली. होनकॉन यांनी 16 एप्रिल रोजी आपली पहिलीच लक्झरी कार, फेरारी 458 स्पायडरची डिलीव्हर घेतली. दुपारी सुमारे 2:30 वाजता, टोक्योच्या मिनाटो भागातील शूतो एक्सप्रेसवेवर त्यांनी कार चालवायला सुरुवात केली. काही वेळाने त्यांना कारमधून पांढरा धूर निघत असल्याचे दिसले. सुरुवातीला त्यांना वाटले की हा धूर शेजारील वाहनातून येत आहे, पण जेव्हा ती गाडी पुढे गेली, तेव्हा त्यांना लक्षात आले की त्यांच्या फेरारीच्या इंजनमधूनच धूर निघत आहे.

Ferrari Burns 1 Hour After Delivery: 

त्यांनी तातडीने कार थांबवली, बाहेर उतरले आणि अग्निशमन दलाला कळवले. काही क्षणांतच कारने पेट घेतला, आणि 20 मिनिटांत आग विझवण्यात यश आले, पण तोपर्यंत कार जवळपास पूर्णपणे जळून खाक झाली होती. केवळ पुढील बम्परचा काही भाग शाबूत राहिला. सुदैवाने, या घटनेत कोणालाही इजा झाली नाही, आणि यापूर्वी कोणतीही टक्कर झाल्याचेही पुरावे नाहीत. या संपूर्ण घटनेनंतर, होनकॉनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सर्व तपशील शेअर केले. या घटनेने जपानमधील सोशल मीडियावर खळबळ उडवली असून, होनकॉन यांच्या दुर्दैवी अनुभवाबद्दल सहानुभूती व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा: Maharashtra Bike Taxi Policy: महाराष्ट्र सरकारकडून बाईक टॅक्सी धोरणाला मान्यता; अ‍ॅग्रीगेटर्ससाठी अनेक अटी लागू, 100% इलेक्ट्रिक फ्लीट अनिवार्य)

या घटनेने होनकॉन यांना मोठा धक्का बसला असून, संपूर्ण जपानमध्ये असा अनुभव घेणारा आपण एकटेच असून असे ते म्हणाले आहे. त्यांनी जळत्या कारचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले, जे तात्काळ व्हायरल झाले. पोलीस डिपार्टमेंटने या घटनेच्या कारणांचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक अहवालात असे दिसून आले आहे की, कारला कोणतीही टक्कर झाली नव्हती, आणि आग इंजन किंवा इंधन प्रणालीशी संबंधित असावी. फेरारी 458 स्पायडर ही हाय-परफॉर्मन्स कार आहे, ज्यामुळे इंजनचा अति तापमान किंवा इंधन गळती यांसारख्या समस्यांमुळे आग लागण्याची शक्यता तपासली जात आहे.