PM Narendra Modi On Pahalgam Terror Attack

नुकतेच 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये दहशतवाद्यांनी 26 निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी घेतला. या घटनेमुळे संपूर्ण देश दुःखी आहे. जगभरातून हा हल्ल्याबाबत निंदा होत आहे. आता पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या घटनेवर भाष्य केले आहे. बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात पंचायती राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्यांसाठी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या मधुबनी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर जोरदार टीका केली.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल पंतप्रधान मोदी म्हणतात, ‘आज, बिहारच्या भूमीवर, मी संपूर्ण जगाला सांगतो की, भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांना ओळखेल, शोधून काढेल आणि शिक्षा करेल. आम्ही शेवटापर्यंत त्यांचा पाठलाग करू. दहशतवादामुळे भारताचा आत्मा कधीही तुटणार नाही. दहशतवादाला शिक्षा ही होणारच. न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या आमच्या संकल्पात संपूर्ण राष्ट्र एक आहे. मानवतेवर विश्वास ठेवणारा प्रत्येकजण आपल्यासोबत आहे. विविध देशांच्या लोकांचे आणि त्यांच्या नेत्यांचे मी आभार मानतो जे आपल्यासोबत उभे राहिले आहेत.’

PM Narendra Modi On Pahalgam Terror Attack: 

ते पुढे म्हणाले, ’22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी देशातील निष्पाप लोकांची हत्या केली... या घटनेनंतर देश दुःखी आणि वेदनेत आहे. आम्ही पीडितांच्या कुटुंबांसोबत उभे आहोत... दहशतवाद्यांना सोडले जाणार नाही, त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल... मी अगदी स्पष्ट शब्दात सांगू इच्छितो की या दहशतवाद्यांना आणि या हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल. आता दहशतवाद्यांना जमीनदोस्त करण्याची वेळ आली आहे.’ (हेही वाचा: Indus Waters Treaty: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने स्थगित गेला पाकिस्तानसोबत सिंधू जल करार; जाणून घ्या नक्की काय आहे 'इंडस वॉटर्स ट्रीटी' व याचे महत्व)

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जग हादरले आहे. या हल्ल्यात 26 भारतीयांना आपला जीव गमवावा लागला. टीआरएफ नावाच्या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या घटनेबाबत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सीसीएसची बैठक झाली, ज्यामध्ये पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये सिंधू जल करार निलंबित, अटारी-वाघा सीमा क्रॉसिंग बंद, पाकिस्तानी नागरिकांच्या भारतीय हद्दीत प्रवेशावर निर्बंध अशा बाबींचा समावेश आहे.