Encounter In Udhampur (फोटो सौजन्य - X/@Whiteknight_IA)

Jammu and Kashmir: गुरुवारी जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir) च्या उधमपूर जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत (Encounter) एक जवान शहीद झाला. अधिकृत सूत्रांनुसार, जिल्ह्यातील दुडू-बसंतगड भागात गोळीबार सुरू आहे. धोकादायक भूभाग आणि घनदाट जंगलासाठी ओळखला जाणारा हा भाग भारतीय लष्कराच्या 9 व्या कॉर्प्सच्या अखत्यारीत येतो. दरम्यान, व्हाईट नाईट कॉर्प्सने एक्सवर या चकमकीची माहिती देताना सांगितले की, विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, उधमपूरच्या बसंतगड परिसरात आज जम्मू आणि काश्मीर पोलिसांसोबत संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली. सुरुवातीला झालेल्या चकमकीत आमच्या एका शूर सैनिकाला गंभीर दुखापत झाली आणि नंतर सर्वोत्तम वैद्यकीय प्रयत्नांनंतरही तो मरण पावला. शहीद झालेल्या सैनिकाची ओळख पटली असून जंतू सिंग असं त्याचं नाव आहे.

घनदाट जंगलात चकमक -

भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनुसार, विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई सुरू करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, या भागात किमान तीन दहशतवादी दिसले आहेत. आव्हानात्मक भूगोल आणि घनदाट जंगलात हल्ला होण्याची शक्यता असल्याने सुरक्षा दल सावधगिरीने काम करत आहेत, असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले. ही चकमक घनदाट जंगलाने व्यापलेल्या उंचावरील प्रदेशात होत आहे, हा प्रदेश असंख्य नैसर्गिक गुहा आणि लपण्याची ठिकाणे असलेला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांनी ही चकमक झाली. (हेही वाचा - Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोरांची माहिती देणार्‍यांना 20 लाखांचे बक्षीस जाहीर)

पहलगाम हल्ल्यानंतर खोऱ्यात सलग दोन चकमकी -

बुधवारी जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यातील तंगमार्ग भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली होती. दहशतवाद्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर गोळीबार केल्यानंतर ही चकमक सुरू झाली.