
Shopian Encounter: जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सुरू केले आहे. दरम्यान, मंगळवारी सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील शोपियान (Shopian) मध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले आहे. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक (Encounter) सुरू आहे ज्यामध्ये 3 दहशतवादी ठार झाले आहेत.
दहशतवाद्यांचे टॉप कमांडरला घेरण्यात आलं -
जम्मू-काश्मीरमधील शोपियान येथील केलर वनक्षेत्रात घेराव आणि शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांना गोळीबाराचा आवाज ऐकू आला. यानंतर, परिसराची घेराबंदी कडक करण्यात आली आणि परिसरात अधिक सुरक्षा दल पाठवण्यात आले. परिसरात 2 ते 3 दहशतवादी घेरले असल्याची बातमी आली. वृत्तानुसार, यातील एक दहशतवाद्यांचा टॉप कमांडर होता. (हेही वाचा - जम्मू आणि काश्मीरच्या सांबा मध्ये भारताने पाडले पाकिस्तानी ड्रोन; पंजाब च्या Hoshiarpur मध्येही ब्लॅकआऊट (Watch Video))
3 दहशतवाद्यांचा खात्मा -
प्राप्त माहितीनुसार, शोपियानच्या शुक्रू केलर भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची विशिष्ट माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. सुरक्षा दलांनी परिसरात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली तेव्हा दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. या गोळीबाराला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनीही मोहीम सुरू केली आहे. पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या 3 दहशतवाद्यांचे पोस्टर काश्मीरमध्ये लावण्यात आले आहेत. या तीन दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दल सतत ऑपरेशन करत आहेत. काश्मीरमध्ये पोस्टर्स लावून सर्वसामान्यांना संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे जेणेकरून सर्वजण या दहशतवाद्यांना ओळखू शकतील.