Manmohan Singh vs Narendra Modi: पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी (Narendra Modi) अधिक यशस्वी ठरले की मनमोहन सिंह? ही चर्चा अनेकदा केली जाते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा आज (26 सप्टेंबर 2019) वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांच्या यशस्वी कारभाराबाबतचा हा एक अहवाल. मे 2004 ते 2009 आणि 2009 ते मे 2014 या कालावधीत मनमोहन सिंह हे सलग दोन टर्म पंतप्रधान राहिले. तर, 2014 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर नरेंद्र मोदी हे सत्तेवर आले. तेव्हापासून आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आहेत. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेवर आले. आकडेवारी सांगते की 2014-15 ते 2018-19 या काळात भारतीय अर्थव्यवस्था वाढीचा दर 7.5% राहिला. थोड्याफार फरकाने अर्थव्यवस्था तशीच पुढे सरकत राहिली. सन 101-12 ते 2018-19च्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक आहे.
दरम्यान, विद्यमान स्थिती अर्थव्यवस्थेची स्थिती चिंताजनक दिसत आहे. अर्थव्यवस्था सध्या अडचणीत असून, बाजारात मंदी दिसत आहे. निर्यात सातत्याने घेटत असून, औद्योगिक उत्पादन आणि ग्राहकांची मागणीही प्रचंड घटत आहे. वाहन उद्योगही मंदावला आहे. गेल्या कैक वर्षातील या उद्योगात निचांकी पातळी दिसत आहे. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित केला जात आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यापैकी कोण अधिक यशस्वी पंतप्रधान ठरले. 'लाईव मिंट' या संकेतस्थळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळाचा तुलनात्मक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यात पंतप्रधान मनमोहन सिंह हे कार्यपद्धतीच्या तुलनेत नरेंद्र मोदी यांच्या पेक्षा अधिक प्रभावी पंतप्रधान राहिले आहेत. ही तुलना करताना लाईव मिंटने काही मुद्द्यांचा आधार घेतला आहे.
प्राप्तिकर वाढीचा दर (Income Tax Growth Rate)
प्राप्तिकर हा अर्थव्यवस्थेची प्रकृती तपासण्याचे एक सर्वमान्य सूत्र आहे. यात स्पष्ट दिसते की, लोकांचे उत्पन्न वाढते आहे की नाही. आकडे सांगतात की मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात वार्षीक कर उत्पन्न दर हा 17.53% प्रतिवर्ष असा राहिला आहे. तर हाच दर पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या काळात 16.85% इतका राहिला आहे. विशेष म्हणजे विद्यमान सरकारच्या काळातील ही स्थिती तेव्हाची आहे जेव्हा लोक मोठ्या प्रमाणावर आयकर रिटर्न करत आहेत. याचाच अर्थ असा की, इनकम टॅक्स ग्रोथमध्ये तेजी दिसत नाही.
कॉरपोरेट टैक्स ग्रोथ (Corporate Tax Growth)
मोदी सरकारने नुकतीच कॉर्पोरेट टॅक्समध्ये मोठी सवलत दिली. ज्यामुळे अर्थव्यवस्थेवर तब्बल 1.45 लाख कोटी रुपयांचा बोजा पडला. मनमोहन सिंह आणि नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाचा विचार करता मोदी सरकारच्या कार्यकाळात कॉर्पोरेट टॅक्स कलेक्शन दर 11.20% आहे. जो पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या अर्थातच युपीए सरकारच्या काळात 13.09 इतका होता.
स्थानिक आर्थिक बचत (Household Financial Savings)
स्थानिक आर्थिक बचतीच्या आकडेवारीतून लोक किती आणि कशापद्धतीने बचत करत आहेत हे स्पष्ट होते. दरम्यान, ही आकडेवारी 2010-12 पासून पुढे उपलब्ध आहे. आकडेवारीनुसार मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात स्थानिक वित्तीय बचत ही 13 टक्क्यांनी वाढताना दिसत होती. मोदी सरकारच्या कार्यकाळात (2017-18) ही बचत केवळ 11.94 टक्क्यांनी वाढताना दिसत आहे. शुद्ध घरेलू वित्तीय बचतीबाबत बोलायचे तर मनमोहन सिंह याच्या कार्यकाळात ही आकडेवारी 13.79 % राहिली. तर, मोदी कार्यकाळात (2016-17) ही आकडेवारी 7.38% इतकी राहिली. (हेही वाचा, नोंटबंदी हा आर्थिक धक्का, त्यामुळे विकासदर मंदावला; अरविंद सुब्रमण्यन यांचा नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणांवर कटाक्ष)
सीमेंट उत्पादन (Cement production)
मोदी सरकारच्या कार्यकाळात सीमेंट उत्पादन 4.32% इतके राहिले तर, हेच प्रमाण मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात 4.05% इतके होते. मोदी सरकारच्या कार्यकाळात रस्तेबांधीन उद्योग मोठ्या प्रमाणावर विकास पावताना दिसतो आहे, असे असतानाही सीमेंट उत्पादन मात्र कमीच राहिले आहे. खासगी क्षेत्रात हे प्रमाण तर अधिकच कमी राहिले आहे.
रेल्वे प्रवास तिकीट दर
रेल्वेची आर्थिक स्थितीही मोदी सरकारच्या कार्यकाळात अडचणीची राहिली आहे. खासगी हवाई कंपन्यांचे कलेक्शन मोदी सरकारच्या कार्यकाळात वाढले आहे. मात्र, भारपतीय रेल्वे प्रवासी दरात मात्र घट पाहायला मिळते आहे. मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात रेल्व उत्पन्नाचा आकडा 10.81 टक्के होता मोदी सरकारच्या कार्यकाळात घसरुन 7.32% इतका राहिला आहे.
दुचाकी वाहन विक्री
मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात दुचाकी वाहन विक्री प्रतिवर्ष 12.44% इतकी राहिली होती मोदी सरकारच्या कार्यकाळात ही आकडेवारी 5.35% इतकी राहिली आहे. यूपीए सरकारच्या कार्यकाळात स्कूटर विक्री दर 25.7 टक्के इतका राहिला होता. एनडीए सरकारच्या कार्यकाळात हा दर 13.21% इतका राहिला आहे. (हेही वाचा, Effects Of Demonetisation: नोटबंदी निर्णयाच्या तडाख्यात 50 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या – अहवाल)
ट्रॅक्टर विक्री
ग्रामीण अर्थव्यवस्था खास करुन शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचे मानक समजल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर विक्री मोदी सरकारच्या कार्यकाळात 4.89% इतकी राहिली आहे. तर, हीच आकडेवारी मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात 15.73% इतकी राहिली आहे. आकडेवारीनुसार मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात 2013-14 मध्ये एकूण 6 लाख 34 हजार ट्रॅक्टर विक्री झाली होती. मोदी सरकारच्या कार्यकाळात 2015-16 मध्ये ही आकडेवारी घटली असून केवळ 4 लाख 94 हजार ट्रॅक्टर विक्री झाली आहे. ही आकडेवारी शेतकऱ्यांवर असलेले संकट दर्शवते.
वरील सर्व आकडेवारी ही 'लाईव मिंट' या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तातील आकडेवारीवर आधारीत आहे. केंद्रातील भाजप प्रणीत एनडीए सरकार हे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकास करत असल्याचा दावा नेहमीच करत आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विदेश दौरे, त्याला प्रसारमाध्यमांतून मिळणारी प्रसिद्धी, सकारात्मक असली तरी, वास्तव भलतेच असल्याचे आकडेवारीवरुन पुढे येत आहे. दरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर त्यांच्या अबोलपणामुळे सत्ताधारी आणि मनमोहन सिंह पर्यायाने काँग्रेस विरोधक नेहमीच टीका करताना दिसतात. मात्र, आकडेवारीच्या आधारावर बोलायचे तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजप प्रणीत एनडीए सरकारपेक्षा अधिक प्रभावी ठरल्याचे चित्र दिसते.