Photo Credit- X

जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक मेळावा असलेला प्रयागराज येथील महाकुंभ (MahaKumbh 2025), हा स्वतःमध्ये एक मोठा विक्रम आहे. या ठिकाणी भाविकांच्या संख्येबाबत मोठा विक्रम रचला गेला आहे. आता इथे आणखी काही विश्वविक्रम (World Records) होणार आहेत. पवित्र त्रिवेणीच्या काठावर शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसांसाठी दररोज जागतिक विक्रम केले जातील. यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची टीम आली आहे. महा कुंभ 2025 हा जगातील सर्वांत मोठा धार्मिक मेळा आहे, जो उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत आयोजित केला जात आहे. या महोत्सवात, गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या संगमावर स्नान केल्याने पापांचे क्षालन होते आणि मोक्षप्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे.

काल, शुक्रवारी जगात पहिल्यांदाच, 300 स्वच्छता कर्मचाऱ्यांनी पहिला नदी स्वच्छता विक्रम रचला. महाकुंभमेळ्याच्या सीईओ आकांक्षा राणा यांनी याला ऐतिहासिक यश म्हटले. या उपक्रमाद्वारे, प्रशासन आणि उत्तर प्रदेश सरकारचे उद्दिष्ट, देश आणि जगाला हा संदेश देणे आहे की नद्या आणि जलस्रोत स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. महाकुंभमेळा प्रशासन असे आणखी विक्रम करण्याची योजना आखत आहे. पुढील टप्प्यात, 15 हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांद्वारे रस्ते स्वच्छ केले जातील. ही स्वच्छता मोहीम एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केली जाईल. (हेही वाचा: Mahakumbh 2025: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबासह महाकुंभात केले पवित्र स्नान, पहा व्हिडिओ)

केले जाणारे इतर विश्वविक्रम-

यासह  त्रिवेणी संगमच्या काठावर भाविक एकत्र येऊन जगातील सर्वात लांब मानवी साखळी तयार करतील, जी एकता आणि सामूहिक अध्यात्माचे प्रतीक असेल.

आरोग्य आणि आध्यात्मिक सुसंवाद वाढविण्यासाठी, मोठ्या प्रमाणात योग सत्राचे नियोजन केले आहे, ज्यामध्ये हजारो लोक एकत्रितपणे योग आसने करतील.

सहभागी एकत्रितपणे स्तोत्र गायन करण्यासाठी एकत्र येतील, ज्याचा उद्देश सर्वात मोठ्या सामूहिक पठणाचा विक्रम प्रस्थापित करणे आणि वातावरण भक्तीमय उत्साहाने भरणे असेल.

त्रिवेणी मार्गावर 1001 ई-रिक्षा चालवून अजून एक विक्रम केला जाईल.

यासह 10,000 लोकांच्या हाताचे ठसे घेण्याचा जागतिक विक्रमही केला जाणार आहे.

व्यापक व्यवस्था-

उत्तर प्रदेश सरकारने या विक्रमी प्रयत्नांच्या यशाची खात्री करण्यासाठी व्यापक व्यवस्था केली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स टीमची उपस्थिती ही महाकुंभमेळ्याचे जागतिक महत्त्व अधोरेखित करते. महाकुंभमेळ्यात हे विक्रम करताना अपेक्षित असलेल्या मोठ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी अधिकाऱ्यांनी कडक सुरक्षा प्रोटोकॉल लागू केले आहेत.

दरम्यान, आता येत्या 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री रोजी शेवटचे शाही स्नान पार पडणार आहे. कुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने 40 चौरस किलोमीटर क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारल्या आहेत, ज्यामध्ये 50,000 सुरक्षा कर्मचाऱ्यांची नेमणूक आणि यात्रेकरूंसाठी तात्पुरत्या सुविधांचा समावेश आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने, एआय-आधारित कॅमेऱ्यांद्वारे गर्दीचे निरीक्षण केले जात आहे, जेणेकरून यात्रेकरूंची सुरक्षा सुनिश्चित करता येईल. महा कुंभ 2025 मध्ये, 400 ते 450 दशलक्षांहून अधिक यात्रेकरूंची उपस्थिती अपेक्षित आहे.