सोमवारपासून महाकुंभ 2025 (Maha Kumbh 2025) सुरू होत आहे. महाकुंभाची तयारीही अंतिम टप्प्यात आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील संगमाच्या तीरावर आयोजित करण्यात येणाऱ्या या महाकुंभमेळ्यात देश-विदेशातील हजारो साधू-भक्त सहभागी होणार आहेत. महाकुंभ हा जगातील असा एक कार्यक्रम आहे, ज्यामध्ये जगातील एकूण लोकसंख्येपैकी पाच टक्के लोक एकाच ठिकाणी आणि एकाच शहरात येतील. जर आपण आकडेवारी पाहिली तर हा आकडा इतका जास्त आहे की, तो पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येलाही मागे टाकेल. यावेळी महाकुंभ 2025 मध्ये एकूण 40 कोटी भाविक येण्याची शक्यता असल्याचे मानले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमपेक्षा 160 पट अधिक परिसरात महाकुंभ आयोजित केला जात आहे. हा एकूण 4000 हेक्टर क्षेत्रात आयोजित केले जाईल. जगातील सर्वात मोठे स्पोर्ट्स स्टेडियम अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आहे जे 25 हेक्टरमध्ये बांधले गेले आहे. कुंभमेळ्यात बांधण्यात आलेल्या शौचालयांची संख्या अमेरिकेच्या तुलनेत 300 पट अधिक आहे. कुंभमध्ये एकूण दीड लाख शौचालये बांधण्यात आली आहेत, तर अमेरिकेत एक लाख लोकसंख्येमागे आठ शौचालये आहेत.
कुंभच्या आयोजनावर झालेला खर्च हा राम मंदिराच्या उभारणीवर झालेल्या खर्चापेक्षा तिप्पट आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी अंदाजे 1800 कोटी रुपये खर्च आला आहे, तर कुंभ आयोजित करण्यासाठी 6382 कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. कमाईवर नजर टाकली तर कुंभ आयोजनातून मिळणारी कमाई आयपीएलच्या कमाईपेक्षा 10 पट जास्त आहे. जगातील काही प्रतिष्ठित संस्था आणि कार्यक्रमांच्या तुलनेत कुंभचे उत्पन्न कितीतरी पटीने अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. (हेही वाचा: Maha Kumbh Mela 2025: प्रयागराज येथील महा कुंभमेळ्याला जाण्यासाठी भारतीय रेल्वे चालवणार 1 हजार विशेष गाड्या; अश्विनी वैष्णव यांची माहिती)
दरम्यान, महाकुंभ हे केवळ श्रद्धा आणि अध्यात्माचे केंद्र नाही, तर ते भारताचे सामर्थ्य, आर्थिक क्षमता आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक आहे. हा कार्यक्रम जगातील सर्वात मोठा मेळा म्हणून ओळखला जातो. येथे येणाऱ्या भाविकांना धार्मिक विधींसोबतच भारतीय संस्कृती, कला आणि वारसा अनुभवायला मिळतो. म्हणूनच युनेस्को अर्थात संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्थेने कुंभमेळ्याचा 2017 मध्ये 'मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा' या यादीत समावेश केला आहे.