Somu Veerraju (Photo Credit : ANI)

निवडणुकांमध्ये मते मिळविण्यासाठी राजकारणी विविध मार्गांनी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. कधी आश्वासनांच्या माध्यमातून तर कधी काही वस्तू भेट देऊन मत मिळवण्याचा प्रयत्न होतो. काही नेते पैसे वाटतात तर काही लोक कमी किंमतीमध्ये दारू (Liquor) पुरवण्याबाबत भाष्य करतात. असेच आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) लोकांनाही स्वस्तात दारू पुरवण्याबाबत आश्वासन दिले जात आहे. ही ऑफर कोणत्या क्षुल्लक कार्यकर्त्याची नसून खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू (Somu Veerraju) यांनी दिली आहे.

आंध्र प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू यांचे एक विचित्र विधान समोर आले आहे. भाजपची सत्ता आल्यास राज्यात दर्जेदार दारूची क्वार्टरची बाटली 50 रुपयांना उपलब्ध करून दिली जाईल, असे ते म्हणाले आहेत. सध्या राज्यात दर्जेदार दारूची क्वार्टरची बाटली 200 रुपयांना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. मंगळवारी पक्षाच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यादरम्यान, राज्यात बनावट ब्रँडची दारू चढ्या भावाने विकली जात असल्याचा आरोप करत वीरराजू यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. राज्यात चांगली ब्रँडेड दारू उपलब्ध नाही, असे ते म्हणाले.

भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यातील प्रत्येक व्यक्ती दारूवर महिन्याला 12  हजार रुपये खर्च करत आहे. राज्यात एक कोटी लोक दारू पितात, या एक कोटी लोकांनी भाजपला मतदान करावे, असे मला वाटते. भाजपचे सरकार आल्यास त्यांना 75 रुपयांना दर्जेदार दारूची बाटली दिली जाईल. महसूल चांगला असेल तर 50 रुपये प्रति बाटलीही विकली जाईल. सरकारच्या लोकांचे दारूचे कारखाने असून, ते राज्यात निकृष्ट दर्जाची दारू देत असल्याचा आरोप त्यांनी केला. (हेही वाचा: अबब! 196 कोटी रोख रक्कम, 23 किलो सोने, 600 किलो चंदन तेल; पीयूष जैनच्या घरी सापडलेली संपत्ती पाहून अधिकारीही चक्रावले)

यावेळी वीरराजू म्हणाले की, अमरावतीला राजधानी बनवण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे आणि राज्यात सत्ता आल्यास तीन वर्षांत त्याचा विकास केला जाईल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू यांनी मंगळवारी विजयवाडा येथे हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा विधानांचा आणि आश्वासनांचा फेरा सुरू होऊ शकतो.