उत्तर प्रदेशातील परफ्यूम व्यापारी पियुष जैन (Piyush Jain) याच्या कानपूर आणि कन्नौज येथील घरातून नक्की किती संपती सापडली हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण देश उत्सुक आहे. या सर्व संपत्तीची मोजणी पूर्ण झाली असून, याची आकडेवारीही समोर आली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, कानपूर आणि कन्नौजमधील पियुष जैनच्या घरातून आणि गोदामातून एकूण 213.45 कोटी रुपये जप्त केले आहेत. यामध्ये रोख रक्कम, सोने आणि चंदनाच्या तेलाचा समावेश आहे. पीयूष जैनच्या दोन्ही घरातून सापडलेली रोकड जीएसटी विभागाने जप्त केली असून, पीयूष जैनला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
एकूण वसुली अशा प्रकारे -
कानपूरमधून 177.45 रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत, तर कन्नौजमधून 19 कोटी रुपये सापडले आहेत. त्याचवेळी 23 किलो सोन्याच्या विटाही सापडल्या आहेत, त्याची किंमत सुमारे 11 कोटी रुपये आहे. याशिवाय चंदनाचे तेलही सापडले असून ते 600 किलो असून त्याची किंमत 6 कोटी रुपये आहे. अशाप्रकारे, DGGI टीमने रोख रक्कम आणि वस्तूंसह एकूण 213.45 कोटी रुपये जप्त केले आहेत.
न्यायालयाने सोमवारी पियुष जैनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सोन्याच्या तस्करी प्रकरणी, डीआरआयने पीयूष जैन विरुद्ध कस्टम कायद्याच्या 110 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीयूष जैनकडून जप्त करण्यात आलेले सोने हे दुबईतून तस्करी झाल्याचा संशय महसूल गुप्तचर महासंचालनालयाला आहे. सोन्याच्या बिस्किटाचा अनुक्रमांक पुसून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. डीआरआय लवकरच न्यायालयात अर्ज करून पीयूष जैनचा ताबा घेणार असल्याचे मानले जात आहे.
यामुळे हे सोने परदेशातून कसे आणले, कस्टम ड्युटीमध्ये किती फसवणूक झाली आणि दुबईसह सिंगापूरमधील कोणती कंपनी कस्टम कायद्याचे उल्लंघन करून पियुष जैनला परफ्युमच्या कच्च्या मालाच्या बदल्यात सोन्याची बिस्किटे पाठवत होती, या सर्व गोष्टींचा शोध घेता येईल. (हेही वाचा: Insurance असल्यास कंपन्यांना क्लेम द्यावाच लागेल, Mediclaim Policy संबंधित सुप्रीम कोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय)
दरम्यान, पियुष जैन हा कन्नौज आणि कानपूर येथील परफ्यूमचा मोठा व्यापारी आहे. पियुषचा जन्म कन्नौजमध्ये झाला आणि त्याचे तिथे घरही आहे. जैन हा 40 हून अधिक कंपन्यांचा मालक आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या दोन कंपन्या मध्यपूर्वेतही आहेत. कन्नौजमध्ये जैनच्या परफ्युम कारखान्यासह कोल्ड स्टोरेज आणि पेट्रोल पंपही आहेत. पियुषने आपल्या कंपन्यांचे मुख्य कार्यालय मुंबईत केले असून येथून त्याच्या कंपनीचे परफ्यूम परदेशात निर्यात केले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, पियुषचे मुंबईत एक आलिशान घरही आहे.