Doctors at a medical facility | File Image | (Photo Credits: PTI)

सध्या जगातील जवळजवळ सर्व देश कोरोना विषाणूच्या तावडीत सापडले आहेत. चीननंतर अनेकांच्या मृत्यूनंतर आता इटली आणि इराण येथे तशीच भयानक परिस्थिती उद्भवली आहे. सध्या जगातील अनेक देश या विषाणूवर लस अथवा औषध निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र अजूनतरी कोणत्याच देशाला यश आले नाही. अशात केरळ येथे एचआयव्ही अँटी-व्हायरल औषध देऊन कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात आल्याची माहिती मिळत आहे. केरळच्या एर्नाकुलम हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ही माहिती दिली आहे.

केरळमध्ये प्रथमच कोरोना व्हायरसच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी एचआयव्हीबाबतची औषधे वापरली आहेत. केरळच्या एर्नाकुलम मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झालेल्या कोरोना रूग्णांना लोपिनवीर आणि रिटोनवीर ही एचआयव्ही अँटी-व्हायरल औषधे देण्यात आली. महत्वाचे म्हणजे ही औषधे ज्या ब्रिटीश व्यक्तीला दिली गेली होती, त्या व्यक्तीची कोरोना व्हायरस चाचणी नकारात्मक आली आहे. यापूर्वी कोरोना विषाणूची चाचणी सकारात्मक आलेल्या या रुग्णाने, रिटोनवीर आणि लोपीनावीर या औषधांच्या संयोजनाला चांगला प्रतिसाद दिला आहे. आता त्याच्या ताज्या चाचणी निकालांमध्ये तो बरा झाल्याचे दिसून आले आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णाला सलग सात दिवस ही औषधे दिली गेली होती. औषधे दिल्यानंतर तीन दिवसांनी यांच्या नमुन्यांची चाचणी केलेई गेली, ज्यामध्ये ती नकारात्मक आली. 23 मार्च रोजी पुन्हा दुसऱ्यांदा तपासणी झाली, त्यामध्ये अहवाल नकारात्म आला, त्यानंतर डॉक्टरांनी या गोष्टीची पुष्टी केली. दरम्यान, याआधी जयपूरच्या रूग्णालयात रूग्णांवर उपचार करण्यासाठी ही औषधे वापरली गेली होती. (हेही वाचा: कोरोना व्हायरससाठी आरोग्य मंत्रालयाकडून Anti-HIV औषधांची शिफारस; जयपूरच्या इटालियन जोडप्याला देण्यात आला डोस)

तसेच काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) कोरोनावर मात करण्यासाठी अँटी एचआयव्ही औषधे 'लोपीनावीर’ आणि ‘रीटोनाविर' यांची शिफारसही केली होती. ही औषधे रुग्णांच्या स्थितीच्या तीव्रतेनुसार, केस-दर-केस वापरली जातील, असे सांगितले होते. आता केरळमध्ये जिल्हाधिकारी एस. सुहास यांनी पुढाकार घेऊन ही औषधे उपलब्ध करुन दिली. त्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाची संमती घेऊन उपचार प्रोटोकॉलमध्ये बदल केला व त्याचा परिणाम म्हणजे आता हा रुग्ण पूर्णतः ठीक झाला आहे.